* नोंदणी व परवाना यांच्या शुल्कात दुपटीने वाढ
* सोमवारपासून नवीन शुल्क लागू
एका बाजूला पेट्रोल, डिझेल अशा इंधनांच्या दरांत भरमसाठ वाढ होत असताना दुसरीकडे हे इंधन पिणाऱ्या वाहनांचे नोंदणी शुल्क वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार वाहनांच्या नोंदणी शुल्काबरोबरच विविध परवान्यांचे शुल्कही तब्बल दुपटीने वाढवण्यात येणार आहे. ही वाढ १५ जुलैपासून लागू होणार आहे.
‘मोटार वाहन अधिनियम-१९८८’ यात नोंदणी शुल्क, परवाना शुल्क आदी गोष्टींचे दर ठरवून दिले आहेत. मात्र या अधिनियमातील वाहन नोंदणी, परवाना आदी बाबतीत बदल करणारे परिपत्रक बुधवारी विविध विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयांत पोहोचले. या परिपत्रकाप्रमाणे करण्यात आलेली वाढ सध्याच्या दरांपेक्षा दुप्पट आहे. दुचाकी वाहनांच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी याआधी केवळ ५० रुपये आकारण्यात येत होते. मात्र १५ जुलैपासून तात्पुरत्या नोंदणीसाठी दुचाकी धारकांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच हलक्या मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी आकारल्या जाणाऱ्या १०० रुपये या शुल्कात वाढ करण्यात आली असून आता हे शुल्क २०० रुपये एवढे करण्यात आले आहे. या परिपत्रकाचा फटका रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या चालकांनाही बसणार आहे. मीटर बसवलेल्या मोटार कॅबसाठी परवाना देण्यासाठी किंवा परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आतापर्यंत १०० रुपये आकारले जात होते. आता यात वाढ होऊन २०० रुपये शुल्क आकारले जाईल. तर मीटर नसलेल्या मोटार कॅबसाठी परवाना देणे आणि परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी १५० ऐवजी ५०० रुपये घेण्यात येतील. ‘पर्यटक वाहन’ हा परवाना मिळवण्यासाठी आता ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी हे शुल्क ३०० रुपये होते. तर परवान्याच्या नूतनीकरणासाठी ४५० रुपये घेतले जातील. अनेक वर्षांपासून या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली नव्हती. वाहनांची संख्या आणि वाहनांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. त्यामुळे हे दर वाढवण्यात आले असावेत, अशी प्रतिक्रिया परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
इंधनांच्या दराबरोबर वाहनांची नोंदणीही महागली
एका बाजूला पेट्रोल, डिझेल अशा इंधनांच्या दरांत भरमसाठ वाढ होत असताना दुसरीकडे हे इंधन पिणाऱ्या वाहनांचे नोंदणी शुल्क वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार वाहनांच्या नोंदणी शुल्काबरोबरच विविध परवान्यांचे शुल्कही तब्बल दुपटीने वाढवण्यात येणार आहे. ही वाढ १५ जुलैपासून लागू होणार आहे.

First published on: 12-07-2013 at 09:15 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase cost of registration of vehicle