कोणताही कामधंदा न करता लोकांकडून भीक मागून स्वत: चैनीचे जीवन जगणाऱ्या भिकारी टोळ्यांनी पुन्हा एकदा नागपुरात उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहेत. सणासुदीचे दिवस जवळ आल्याने बाहेरील राज्यातून भिकारी टोळ्यांचे नागपुरात येणे सुरू झाले असून या टोळ्यांवर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा महापालिका किंवा पोलिसांजवळ नाही. परिणामी शहरातील मोक्याच्या जागी टोळ्या बिनबोभाटपणे ‘इझी मनी’ गोळा करून महागाईच्या दिवसात स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत.
भिकाऱ्यांचे दीनवाणे चेहरे, फाटके कपडे, त्यांच्याजवळील लहान बाळे किंवा बालके यांच्याकडे पाहून मन द्रवणारे अनेक आहेत. नेमका याचा फायदा भीक मागणाऱ्या व्यावसायिकांनी उचलला आहे. काही श्रीमंत भिकारी मोबाईल फोन बाळगून आहेत, असे नुकत्याच केलेल्या पाहणीत आढळले. नागपूर शहरात मुक्कम ठोकणारे बहुतांश भिकारी परप्रांतीय असून त्यांची संख्या वाढत चालली आहे. हा उपराजधानीवरील कलंक असतानाही नागरिकांना पर्याय नसल्याने मजबुरी म्हणून भोगावा लागत आहे. शहरातील प्रत्येक मोठा चौक भिकाऱ्यांचा अड्डा झाला आहे. एकतर चौकाच्या बाजूला किंवा पुलाखालील जागा भिकाऱ्यांनी अडविलेल्या दिसतात. रेड सिग्नल केव्हा लागतो आणि वाहनधारकांना केव्हा जाळ्यात ओढतो, याचा दिवस-रात्र सराव सुरू असतो. सकाळी आठ वाजेपासून टोळ्या चौकात जमतात, रात्रीपर्यंत थांबून बक्कळ पैसा गोळा करतात, रात्री मटण-दारू, शिवीगाळ, भांडणे करून पहाटेपर्यंत कुठेतरी ताणून देतात आणि सकाळी पुन्हा चौकात हजर, अशी टोळ्यांची दिनचर्या आहे.
यात सर्वात महत्त्वाची भूमिका बाया आणि उघडी-नागडी वावरणारी लहान मुले बजावत आहेत. पुरुष सदस्यांपेक्षा बायका आणि मुले अधिक कमाई करून देतात. बालके कडेवर घेऊन किंवा त्यांच्या अंगाला खोटे खोटे बँडेज गुंडाळून भीक मागितल्यास अधिक कमाई होते. नेमकी हीच पद्धत नागपुरात अवलंबिली जात आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखाचा असपास असून शंभरपेक्षा जास्त चौकात बिनधास्तपणे भीक मागण्याच्या धंद्यातून दररोज लाखो रुपयांचा चुना नागपुरकरांच्या खिशाला लावला जात आहे आणि पुण्य कमावण्याच्या नावाखाली लोकदेखील स्वत:चा खिसा खाली करीत आहेत.
भीक मागणे हीदेखील एक कला आहे आणि यात विनाश्रमाचा पैसा कमविण्याची सवय झालेले लोक मोठय़ा संख्येने उतरू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून २५ पैसे, ५० पैशाचे नाणे जवळजवळ बाद झाल्यासारखे आहे. त्यामुळे कमीतकमी १ रुपयांपासून १०-२० रुपयांपर्यंत भीक मिळते. शनिवारी बर्डीवरील शनी मंदिरापुढे ‘दानशूर’ म्हणवून घेणारे मोठय़ा प्रमाणावर अन्न आणि पैशांचे वाटप करतात. या ठिकाणी बसण्यासाठी भिकाऱ्यांमध्ये दरवेळी हाणामारी होते. काही दानशूर तर प्रत्येक शनिवारी मोठय़ा रकमेचे वाटप करतात. ही रक्कम मिळविण्यासाठी भिकाऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. काही वेळेला ५० ते १०० रुपयांच्या नोटांची बरसात केली जाते. मग हा पैसा कोण उधळत आहे आणि ही रक्कम तो कुठून आणून येथे उधळतो, याची चौकशीदेखील होत नाही.
‘इझी लाईफस्टाईल’ जगण्यासाठी भीक मागणे हा अनेक कुटुंबांसाठी धंदा झाला आहे. दर आठवडय़ात शहरातील हजारो मंदिरांमध्ये कोणता ना कोणता धार्मिक सोहळा असतो. यानिमित्ताने भोजनाचे वाटप केले जाते. भिकारी अशा जागांच्या शोधातच असतात. त्यांचा दिवस त्या दिवशी निभावून जातो. शिवाय घरीदेखील अन्न नेण्याची संधी मिळते. अशी हजारो कुटुंबे कोणतेही काम करता बिनबोभाटपणे रोजच आपला उदरनिर्वाह फुकटात करीत आहेत आणि पुण्यकर्म-दानधर्माच्या अंधश्रद्धेत अडकलेले लोक या भिकाऱ्यांच्या टोळ्या अप्रत्यक्षपणे पोसत आहेत. ज्या लोकांना काहीही काबाडकष्ट न करता दिवस ढकलायचे आहेत त्यांच्यासाठी भीक मागणे हा सर्वात सोपा धंदा आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भिकाऱ्यांच्या वाढत्या भस्मासूरावर यंत्रणेचे नियंत्रण नाही आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात, या प्रश्नाचे उत्तरही पोलिसांपाशी नाही. सरकारी खाक्यातून मिळालेल्या उत्तरात विधवा, निराधार आणि अन्य अपंग वा घरातून बाहेर हाकललेल्या लोकांसाठी सुधारगृहांची व्यवस्था असली तरी हे लोक तेथून पळून जाऊन पुन्हा भीक मागण्याचाच धंदा करतात. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा नाईलाज झाला आहे. कायद्याजवळही या प्रश्नाचे उत्तर नाही. परंतु, ही समस्या गंभीर होत चालली असून लोकांनीच आता भीक देण्याचे बंद केले तरच थोडाफार चाप बसून शकेल.