नऊ महिन्यांपासून शहरातील विविध भागात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असून दिवसाला एक किंवा दोन अशा सरासरीने या घटना घडत आहेत. परिणामी महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न निर्माण झाला आहे. दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी बघता महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने महिलांचे पथक विविध भागात तैनात केले आहे.
शहर गुन्हेगारी मुक्त व्हावे यासाठी पोलीस विभागातर्फे प्रयत्न केले जात असले तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यापेक्षा ते दिवसेंदिवस वाढतच आहे. घरफोडी, चेनस्नॅचिंग, खंडणी वसुलीचे प्रकार वाढू लागले आहे. सकाळी किंवा रात्रीच्यावेळी ज्या भागात विशेष वर्दळ नाही अशा ठिकाणी महिला पायी किंवा दुचाकी वाहनाने फिरत असताना त्याचा नेमका फायदा हे लुटारू घेत आहेत. जुलै आणि ऑगस्टमध्ये ४० पेक्षा अधिक चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. घरासमोर फुले तोडणाऱ्या किंवा फाटकाजवळ उभ्या असलेल्या महिलेला आवाज देऊन थांबवायचे, पत्ता विचारण्याचा बहाणा करीत तिच्या गळ्यातील सोनसाखळी अथवा मंगळसूत्र खेचून वेगात पळून जायचे, हा नवा फंडा सध्या हे लुटारू वापरत आहेत. या घटनांनी समस्त महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे. रोज सरासरी एक तरी तक्रार चेन स्नॅचिंगची येत असल्यानेपोलिसही वैतागले आहेत. जानेवारी महिन्यात १५, फेब्रुवारीमध्ये १८, मार्च महिन्यात १३, एप्रिलमध्ये १५, मे ३१, जूनमध्ये २०, जुलै १८, ऑगस्ट २१ तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ३ घटनांची नोंद झाली आहे.
चेनस्ॅनचिंगवर आळा बसावा यासाठी चेन स्नॅचिंगविरोधी पथक तयार केले. तरीही या घटना घडतच असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मध्यंतरीच्या काळात अंकुश लागला होता मात्र पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. चेनस्नॅचिंग प्रकरणात बहुतांश कामगार आणि विद्यार्थी वर्ग असल्याचे समोर आले आहे. याशिवाय स्थानिक गुन्हेगारांच्या विविध टोळ्यांसह परप्रांतीय टोळ्याही यात उतरल्या आहेत. शहरातील दुचाकी चोरायची, चेनस्नॅचिंगचा गुन्हा करून ती बेवारस सोडून द्यायची किंवा विकून टाकायची व परप्रांतात पळून जायचे, अशी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत आहे.
सोन्याच्या प्रचलित भावापेक्षा थोडी कमी रक्कम मिळते.  सरासरी वीस हजाराची सोनसाखळी असली तर बारा ते पंधरा हजार रुपये रोख हातावर पडत असल्याने चेन स्नॅचिंग करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याची पोलिसांची माहिती आहे. याचमुळे अनेक तरुण मुले आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही चेन स्नॅचिंग करू लागले असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. नवनवे गुन्हेगार तयार होत असल्याने पोलीसही चिंतीत झाले आहेत. सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडू नये, अशी सूचनाही पोलिसांनी महिलावर्गाला करून पाहिली. काही महिलांनी बेंटेक्सचे दागिने घालणे सुरू केले खरे. दागिने खोटे असल्याचे दिसताच ते महिलांच्या अंगावर फेकून दिल्याचीही काही उदाहरणे आहेत.