देशातल्या एखाद्या छोटय़ा शहरातील एका प्रामाणिक, कर्तव्यकठोर वगैरे पोलीस निरीक्षकाचे आणि त्या शहरातील मातबर नेत्याची किंवा स्थानिक गुंडाची चकमक होते.. तो नेता अथवा गुंड त्या पोलीस निरीक्षकाला आणि जमल्यास त्याच्या पत्नीलाही संपवतो. मात्र त्या निरीक्षकाचा लहान मुलगा आपल्या आईवडिलांचा हा मृत्यू पाहतो आणि गुंडाच्या तावडीतून वाचण्यासाठी जीव काढून पळतो.. पळता पळता त्याला प्लॅटफॉर्मवर उभी असलेली गाडी दिसते, तो गाडीत चढतो.. पडद्यावर धडाड्धडाड् धावणारी गाडी दिसते आणि मुलगा थेट व्हिक्टोरिया टर्मिनसच्या बाहेर गर्दीत गोंधळलेला असतो.. हिंदी चित्रपटांचे आणि रेल्वेचे नाते हे या दृष्याइतकेच पुराणे असले तरी, गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये रेल्वे सातत्याने दिसल्याने हे नाते अधिकच दृढ झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत तर या नात्यापोटी मध्य रेल्वेने १ कोटी ७३ लाखांची घसघशीत कमाई केली. मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर सातत्याने तुटत असल्या, तरी चित्रपटसृष्टी आणि मध्य रेल्वे यांच्यातील ही ‘तार’ येत्या नव्या आर्थिक वर्षांत चांगलीच जोडली गेली आहे. या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात सलमान खानच्या एका नव्या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य रेल्वेवरील एका स्थानकावर झाले. या चित्रीकरणाच्या भाडय़ापोटी एका आठवडय़ात रेल्वेने सव्वापाच लाख रुपये कमावले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत ‘डोंबिवली र्टिन’, ‘भूतनाथ रिटर्न’, ‘देढ इश्किया’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन’, ‘जय हो’ अशा चित्रपटांचे चित्रण मध्य रेल्वेवर झाले होते. याच वर्षांत यशराज फिल्म्सच्या ‘गुंडे’ या चित्रपटाने ६० लाखांचा, राजकुमार हिरानीच्या ‘पीके’ने १४ लाख रुपयांचा आणि ‘जय हो’ने १२ लाख रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळवून दिला. या सर्व यादीत आता सध्याच्या आर्थिक वर्षांत सलमान खानच्याच एका चित्रपटाची भर पडली असून एका आठवडय़ातच या चित्रपटाने तब्बल साडेपाच लाख रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा केले आहेत. मध्य रेल्वेवर चित्रीकरणासाठी आपटा, चौक, पेण, देवळाली, लोणावळा, पुणे, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, वाडीबंदर यार्ड, वठार, निरा, चिखली अशा ‘लोकेशन्स’ना जास्त पसंती मिळते, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले.