इचलकरंजी नगरपालिकेने बाजारशुल्कात वाढ करून अन्यायी करवसुली सुरू केल्याच्या विरोधात शुक्रवारी भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी बेमुदत विक्री बंदचा निर्णय घेऊन नगरपालिकेवर मोर्चा काढला. पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर यांनी आठवडय़ाभरात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आंदोलकांना दिले. दरम्यान, इचलकरंजीत भरणारा शुक्रवारचा आठवडी बाजार आज भरला नव्हता. त्यामुळे थोरात चौकासह विकली मार्केट, अण्णा रामगोंडा भाजी मार्केट, डेक्कन या ठिकाणचे बाजार ओस पडले होते. परिणामी, बाजाराचा दिवस असूनही ग्राहकांना भाजीपाला, फळे मिळू शकली नाहीत.
आर्थिक अडचणीतून वाटचाल करीत असलेल्या इचलकरंजी नगरपालिकेने उत्पन्नवाढीसाठी बाजारशुल्कात वाढ करून त्याची वसुली ठेकेदाराकरवी सुरू केली आहे. भाजीपाला, फळ विक्रेत्यांचा वाढीव बाजारशुल्क देण्यास विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार शुल्कवाढ करण्यास मंजुरी दिल्याने नगरपालिका प्रशासन कर कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे शहरातील भाजीपाला व फळ विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी शुक्रवारपासून बेमुदत विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज विकली मार्केट येथे सर्व विक्रेते एकत्र जमले. त्यांनी थोरात चौकातील आठवडा बाजाराच्या ठिकाणी जाऊन इतर विक्रेत्यांना विक्री बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर मुख्य मार्गाने मोर्चा नगरपालिकेजवळ आला. पालिकेसमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू करीत घोषणाबाजी सुरू केली. उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. आंदोलनाचे नेतृत्व लाल बावटा, भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले स्टॉलधारक संघटनेचे कॉ. दत्ता माने, कॉ. शिवगोंडा खोत, कॉ. सदा मलाबादे, साहेबलाल मुल्ला, आबू मोमीन आदींनी केले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.