निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या शाईचा म्हैसूरहून पुरवठा

मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात शाईच्या १९ लाख बाटल्या लागल्या होत्या.

मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात शाईच्या १९ लाख बाटल्या लागल्या होत्या. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण देशात २५ लाख बाटल्या लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जवळपास ७०० नागरिकांच्या बोटाला लागेल एवढी शाई एका बाटलीमध्ये असते. नागपुरातील एका बुथवर दोन बाटल्यांचा वापर केला जाणार आहे.
सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या शाईच्या १० एम.एल. असलेल्या एका बाटलीची किंमत १८३ रुपये एवढी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश सरकारने १ लाख २० हजार बाटल्या खरेदी केल्या होत्या. तर दिल्लीतील निवडणुकांसाठी ४० हजार बाटल्यांची मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नजर टाकल्यास २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १९ लाख शाईच्या बाटल्या लागल्या होत्या. यावेळी १० एमएलची एक बाटली होती. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १६ लाख ७ हजार शाईच्या बाटल्या लागल्या. यावेळी ५ एमएलची एक बाटली होती. जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे म्हणाले, गेल्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्य़ासाठी शाईच्या पेनाचा वापर करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्य़ात ८ हजार शाईच्या बाटसल्या येणार आहेत. एका बाटलीमध्ये ७०० ते ८०० मतदारांना लागेल एवढी शाई असते. या शाईचे पेटंट भारत सरकारने गुप्त ठेवले आहे. ही शाई तयार करण्यासाठी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते, असेही काही जानकार सांगतात. ही शाई बोटावर लावताच १५ सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंटस् अ‍ॅण्ड वॉर्निश लि. कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत येते. देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे. ही कंपनी जगातील २५ देशांना निवडणुकीसाठी शाई विकते. भारत सरकारसुद्धा निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देत असते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखले जाते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ink for election from mysore