वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात जाणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना डॉक्टरांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असून त्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या बेस्ट समिती अध्यक्षांनाही तोच प्रत्यय आला. त्याचे पडसाद बेस्ट समितीच्या गुरुवारच्या बैठकीत उमटले. त्यामुळे तूर्तास बेस्ट कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठविणे बंद करण्यात आले आहे.
कटकटीचे काम नको म्हणून बेस्ट चालक आणि वाहक डय़ुटी बदलून घेण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यासाठी जे. जे. रुग्णालयात धाव घेऊन कर्मचारी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करू लागले आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडून चांगली वागणूक देण्यात येत नाही, अशा तक्रारी कर्मचारी करू लागले आहेत.
या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील जे. जे. रुग्णालयात गेले होते. परंतु त्यांनाही डॉक्टरांकडून चांगली वागणूक देण्यात आली नाही. याबद्दल सदस्यांनी बैठकीत तीव्र शब्दात आक्षेप घेतला. तसेच संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
या प्रकरणी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी स्पष्ट           केले.
आपली डय़ुटी बदलून घेण्यासाठी अनेक कर्मचारी वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याकरिता जे. जे. रुग्णालयात धाव घेत असल्याचे आढळून आले आहे. काही कर्मचारी त्यासाठी खोटा अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता वैद्यकीय चाचण्यांच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.