राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी पाठपुरावा केल्यानंतर अजित पवार यांनी बंद पडलेल्या जिल्हा बँकेला मदत करण्यासाठी बैठक बोलविली. मात्र, या बैठकीपासून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांना दूर ठेवण्यात आले. परिणामी राज्यमंत्र्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांनी थेट आमदार पंडित यांना बैठक घेण्याचा नैतिक अधिकारच नाही. ते अध्यक्ष असतानाच बँक बंद पडली. त्यांच्या संस्थांकडे कोटय़वधीचे कर्ज थकीत आहे, अशी तोफ डागली. मात्र, प्रशासक होण्याचे स्वप्न भंगल्याने नैराश्येतून सोळंके आरोप करीत असल्याचा पलटवार करत पंडितांनी सारवासारव केली. परंतु या बैठकीवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी, नेते-कार्यकर्त्यांची भरती आलेल्या राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळून आली.