समतावादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र तसेच दलित महासंघ व युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन यांच्यावतीने आज शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेची होळी करण्यात आली. मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेल्या चिपळूण येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवर परशुरामाचे चित्र छापण्यात आलेले असून परशुरामाच्या परशूला लेखणीचा आकार देण्यात आला असून या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. शासनाने या पत्रिका जप्त कराव्यात, त्यांचे वाटप थांबवावे व यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा चिपळूण येथे होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.या वेळी दलित महासंघ जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक, प्रकाश नाईक, अमोल महापुरे, बाबासाहेब दबडे, शंकर कांबळे-कापशीकर आदी उपस्थित होते.