भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली अपर वर्धा धरणक्षेत्रातील सिंभोरा येथून मंगळवारी निघणाऱ्या सिंचन शोध यात्रेला सुरू होण्यापूर्वीच ‘ब्रेक’ लागला आहे. भाजपातील शीर्षस्थ नेत्यांमध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या अंतर्गत कलहाने नागपूरचे भाजप वर्तुळ सुन्न झाले असतानाच ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेची घोषणा केव्हा केली याबाबतही प्रचंड संभ्रम असल्याचे एकंदर चित्र होते. ही यात्रा सुरू होणार असल्याचे अनेक कार्यकर्त्यांना माहितसुद्धा नव्हते. नेमकी पावसाळ्याच्या ऐन तोंडावर कालव्यांच्या काठाने निघणारी सिंचन शोध यात्रा अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती.
देवेंद्र फडणवीस गोव्यात जाऊन आले. तेथे त्यांनी नवे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदींचे अभिनंदनही केले. मोदींच्या निवडीचा रविवारी निवडक भाज कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परंतु, आजच्या अचानक झालेल्या घडामोडींनी भाजप कार्यकर्ते सुन्न दिसून आले.
अप्पर वर्धा धरणक्षेत्रातील सिंभोरा येथे सिंचन शोध यात्रेचा प्रारंभ होईल. यावेळी आमदार रणजित पाटील, प्रवीण पोटे, अरुण अडसड आणि साहेबराव तट्टे प्रामुख्याने सहभागी होणार होते. ही यात्रा सिंचन प्रकल्पांच्या काठाने फिरून अमरावती जिल्ह्य़ातील तिवसा येथे आल्यानंतर बांभोरा, पिंपळखुटा आणि हसीमपूर या खेडय़ांमध्ये प्रवेशल्यानंतर नया वाठोडा या पुनर्वसित खेडय़ातील लोकांकडून निवेदने स्वीकारली जाणार होती. कवठाळा आणि सातगावला भेट दिल्यानंतर ही यात्रा यात्रेत सहभागी झालेले नेते पाणी वापर करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी तिवसा येथे चर्चा करणार होते.
मंगळवारी यात्रेचा मुक्काम अमरावतीलाच राहणार असे ठरविण्यात आले होते. धामणगावात यात्रेचा जाहीर सभेने समारोप केला जाणार होता. मात्र, या शेडय़ूलची नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांना कल्पनाच नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
कमळाची ‘सिंचन शोध यात्रा’अचानक थांबल्याने आश्चर्य
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली अपर वर्धा धरणक्षेत्रातील सिंभोरा येथून मंगळवारी निघणाऱ्या सिंचन शोध यात्रेला सुरू होण्यापूर्वीच ‘ब्रेक’ लागला आहे.
First published on: 11-06-2013 at 08:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation search yatra from bjp get stoped