हस्तिदंतांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून अटक केली. रोहित उदय मेहरा (रा.शाहूपुरी) व सिध्दार्थ काळे (रा.सिध्दार्थनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हस्तिदंतांचे दोन नग मिळाले असून त्यापैकी एकाचे वजन ९२० ग्रॅम तर दुसऱ्याचे ४६० ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे २१ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचेआदेश दिले आहेत.
रोहित उदय मेहता हा हस्तिदंतांची विक्री करण्यासाठी सायबर चौक परिसरात येणार असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.शा.पाटील यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून खासगी वाहनांतून सायबर चौक येथे पाठविली. या भागात रोहित मेहता व सिध्दार्थ काळे हे दोघेजण दुचाकीवरून (एम.एच.०९-बी.जे.७२७१) आले. पोलिसांनी छापा टाकून या दोघांना हस्तिदंतांच्या दोन नगासह पकडले.
    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हस्तिदंतांच्या वस्तू दुर्मिळ मानल्या जातात. त्यांना मागणीही मोठी आहे. मेहता व काळे यांच्यावर वनसंरक्षण कायदा सन १९७२ च्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी, पोलीस नाईक इकबाल महात, किरण गवळी, युवराज पाटील, राजेश होळी, गावडे व महिला पोलीस लाड यांच्या पथकाने केली.