मराठी दूरचित्रवाहिन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असताना काही वेगळ्या पद्धतीच्या रूपरेषांच्या कार्यक्रमांची आखणी करण्याचा प्रयत्नही काहीवेळा केला जातोय. आयएनटी एकांकिका स्पर्धेतून संगीत, अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपला ठसा उमटविणाऱ्या यंदाच्या आयएनटी स्पर्धेतील कलावंतांचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला, त्यांना कलावंत म्हणून कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे अशा स्वरूपाचा, म्हटले तर ‘डॉक्यू-ड्रामा’, म्हटले तर रिअ‍ॅलिटी शो पद्धतीचा कार्यक्रम. ‘जोश अनलिमिटेड’ हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर रविवार, १० नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता दाखविण्यात येणार आहे.
पाटकर महाविद्यालयात शिकणारी ऐश्वर्या तपाडिया, आपल्या संगीतवेडय़ा मित्रांसह ‘समीहन’ या म्युझिक ग्रुपतर्फे एकांकिकांना संगीत देणारा तेजल वराडकर, बेडेकर महाविद्यालयाची तृप्ती गायकवाड, संगीतकार होण्याचे स्वप्न पाहणारा महेश केसकर, तसेच साठय़े महाविद्यालयाचा स्वप्निल कोकाटे अशा तरुण-तरुणींचा सळसळता उत्साह, आपल्या आवडीच्या क्षेत्रात भव्यदिव्य करून दाखविण्याची त्यांची तीव्र इच्छा, त्यांच्या प्रेरणा कोणत्या आहेत हे सारे या कार्यक्रमातून दाखविण्यात येणार आहे. आयएनटी असो वा कोणतीही नावाजलेली एकांकिका स्पर्धा असो, प्रयोगापूर्वीचे काही तास नेपथ्य, अभिनय, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, संगीत, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू अशा क्षेत्रात आपापली कामगिरी करणारे सगळेच कलावंत हिरिरीने काम करीत असतात. तो त्यांचा उत्साह टिपण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला आहे.
या कार्यक्रमाच्या संकल्पनेबद्दल सांगताना ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील म्हणाले की, मराठी तरुणाईची सकारात्मक बाजू, ते पाहत असलेली ताकदीची स्वप्नं, ती स्वप्नं सत्यात साकारण्यासाठी सुरू असलेला त्यांचा संघर्ष हे आयएनटी एकांकिका स्पर्धेच्या रिहर्सलच्या वेळी आम्हाला पाहायला मिळाला. मराठी तरुणाईचा धाडसी स्वभाव, निश्चयाने काम करताना झोकून देण्याची वृत्ती असे अनेक पैलू यातील तरुण-तरुणींचा प्रवास उलगडताना प्रेक्षकांना अनुभवता येतील. ‘जोश अनलिमिटेड’ कार्यक्रमाचा तीन तासांचा पहिला भाग रविवारी दाखविण्यात येत असून, मराठी तरुणाईला भिडतील असे अनेक विषय या कार्यक्रमातून हाताळण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कथ्थक नृत्य शिकणारी पाटकर महाविद्यालयाची ऐश्वर्या तपाडिया अभिनयाकडे वळली. आयएनटीमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. समीहन हा डहाणूकर महाविद्यालयातील दिवंगत अमित पवार, तेजस काळे, राहुल खाडे, तेजल वराडकर या संगीतवेडय़ा तरुणांचा ग्रुप होता. अमित पवारच्या नंतर तेजस-राहुल-तेजल यांनी एकांकिकांना संगीत देण्याचे काम केले आहे. समीहन या ग्रुपतर्फे त्यांना संगीत निर्मितीत उतरायची इच्छा आहे. तेजल वराडकर हा गिटारवादक आहे, त्याचबरोबर संगीतविषयक सर्व तांत्रिक अंगे शिकण्याचा तो प्रयत्न करतोय. ऐश्वर्या आणि तेजल यांच्यासारख्या मराठी तरुणाईला ‘जोश अनलिमिटेड’ कार्यक्रमातून लोकांसमोर येण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.