‘कोल्हापूरचे पत्रकार विकाऊ आहेत, पैसे घेऊन ते बातम्या प्रसिद्ध करतात’ असे विधान करणाऱ्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचा शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी ज्योतिप्रिया सिंग यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांची भेट घेऊन ज्योतिप्रिया सिंग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार करणार आहेत. दरम्यान, महापौर सुनीता राऊत, टोलविरोधी कृती समितीसह विविध संघटनांनी ज्योतिप्रिया सिंग यांचा निषेध नोंदविला आहे.
 टोलविरोधी आंदोलनात निष्क्रिय भूमिका घेतल्याचा ठपका ठेवून गुरुवारी पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार व पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांना निलंबित करण्यात आले. याबाबत माहिती घेण्यासाठी काही पत्रकारांनी ज्योतिप्रिया सिंग यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली तेव्हा त्यांनी कोल्हापुरातील पत्रकारांच्या विकाऊ प्रवृत्तीवर भाष्य करीत अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, असे विधान केले.
पत्रकारांची बैठक सुरू असतानाच येथे येऊन ज्योतिप्रिया सिंग यांनी पत्रकारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण पत्रकारांनी त्यांना भेटण्याचे नाकारले. तरीही त्या पत्रकारांची बैठक संपेपर्यंत शाहू स्मारक भवनमध्ये बसून होत्या.