कधीकाळी कबड्डी या खेळात राज्यस्तरीय स्पर्धामध्ये असणारा नाशिकचा दरारा अलीकडे कमी झाला असला तरी या खेळाच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे व संघटना आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षांत कबड्डीसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त जिल्हा संघटनेच्या कामगिरीचा प्रशांत भाबड यांनी घेतलेला आढावा देत आहोत. कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघटनेला प्रयत्न करावे लागतील, असे मतही त्यांनी मांडले आहे.
अखिल भारतीय हौशी कबड्डी महासंघाची स्थापना १९५२ मध्ये झाली. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा १९५३ मद्ये मध्यप्रदेश ऑलिम्पिक असोसिएशनने नागपूर येथे घेतली. तेव्हापासून या खेळाचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर करण्यासाठी प्रत्येक राज्यात कबड्डी संघटनांची स्थापना करण्यात आली. राज्य संघटनांनी प्रत्येक जिल्ह्य़ात कबड्डी संघटनांचे जाळे विणले. त्याअंतर्गत नाशिक जिल्हा कबड्डी संघटना स्थापन झाली. प्रारंभी संघटनेचा कारभार मालेगाव येथून निशांत स्पोर्ट क्लबचे मोहम्मद इस्माईल हे बघत. संघटनेमध्ये बहुतांश हातमाग कामगारांचा समावेश असल्याने त्यांना दैनंदिन कारभारातून वेळ काढून संघटनेच्या कारभाराकडे लक्ष देण्यात अडचणी येत. १९६४ मध्ये मनमाड येथे नवजीवन क्रीडा मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन यशस्वी केल्यावर राज्य संघटनेचे तत्कालीन कर्तेकर्विते कबड्डी महर्षी शंकरराव साळवी, वसंतराव कोलगावकर, मोरेश्वर गावंड यांनी ही संघटना मालेगावहून हलविण्याचे ठरविले. त्यावेळी स्वातंत्र्यसेनानी वसंतराव हुदलीकर यांनी संघटनेचा कारभार मनमाड येथून चालविण्याचे सूचित केले. त्यानुसार १९६४ पासून मनमाड येथून संघटनेचा कारभार सुरू झाला. त्यावेळी पहिले अध्यक्ष मोहम्मद इस्माईल तर प्रमुख कार्यवाह म्हणून दौलतराव शिंदे यांनी नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेची सूत्रे हाती घेतली. संघटनेचा कारभार चालविण्यासाठी त्याकाळी डी. एस. राऊत, मनमाडचे नगराध्यक्ष गणपत अहिरे, बाबुलाल सर्वे, बाबुभाई सोनवणे, केशव जाधव, राजेंद्र पगारे, चंद्रशेखर आयाचित, शांताराम जाधव अशा कित्येकांनी संघटना वाढीसाठी योगदान दिले. २०१४ हे संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होय.
५० वर्षांच्या कालावधीत संघटनेचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद इस्माईल, डी. के. पगारे, ई. जे. साळवी, आ. जगन्नाथ धात्रक, आबा घाटगे, तुकाराम दिघोळे यांनी काम पाहिले. सध्या आ. उत्तमराव ढिकले हे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. प्रमुख कार्यवाह म्हणून दौलतराव शिंदे, रमेश सोनवणे, केशव जाधव, मनमाडचे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, मोहन गायकवाड अशा दिग्गजांनी काम पाहिले. संघटनेने खेळाच्या प्रचार व प्रसारासह विविध गटातील जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धाचे सातत्याने आयोजन केले. जिल्हा कबड्डी संघटना व मनमाड येथील सम्राट क्रीडा मंडळ यांच्या वतीने डिसेंबरमध्ये राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.
जिल्हा संघटनेच्या ५० वर्षांच्या इतिहासात गुलालवाडी व्यायामशाळा, नवजीवन क्रीडा मंडळ मनमाड, उत्कर्ष क्रीडा मंडळ सय्यद पिंप्री, रणझुंजार क्रीडा मंडळ पांढुर्ली, इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकरोड यासारख्या संघटनांनी निमंत्रितांच्या राज्य स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले. जिल्हा संघटनेस अशा संस्थांकडून साथ मिळत गेल्यानेच संघटना बहरत गेली.
भक्ती कुलकर्णी, अनुराधा डोणगांवकर, निर्मला भोई असे छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू जिल्ह्याने दिले. त्याशिवाय छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक दौलतराव शिंदे, वीर जिजामाता पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका शैलेजा जैन, आंतरराष्ट्रीय खेळाडू – माधुरी गायधनी, अनुराधा डोणगावकर याशिवाय संपत गोळे, परशराम झाल्टे, नितीन पाटील, चंद्रकांत जोशी, कैलास भांगरे, चंद्रकांत माळोदे, भाऊसाहेब लभडे, विनोद सोमासे, विक्रांत मांगडे, प्रणव अहिरे, तुषार माळोदे, सीमा जाधव, रंजना राव, भावना शुक्ल, सोनाली चांदवडकर, सुवर्णा क्षत्रीय, चंदा तांबट, सीमा पवार, वसुंधरा नाईक, रत्नाली कंसारा, दीपाली सुचे, तनुजा कुलकर्णी, पूनम पाटील, शितल दाणे, रश्मी जैन, कविता मोहिते, अपेक्षा मोहिते, सारिका जगताप यांसारखे राष्ट्रीय खेळाडू जिल्ह्याने दिले. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे ही परंपरा यापुढे अशीच सुरू ठेवण्यासाठी संघटनेला निश्चितच अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2014 रोजी प्रकाशित
जिल्हा कबड्डी संघटनेने सातत्य राखण्याची गरज
कधीकाळी कबड्डी या खेळात राज्यस्तरीय स्पर्धामध्ये असणारा नाशिकचा दरारा अलीकडे कमी झाला असला तरी या खेळाच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील विविध संस्था, मंडळे व संघटना आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.
First published on: 10-06-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabaddi