नवोदिता या संस्थेव्दारे देण्यात येणारा कलासाधक सन्मान हा यावर्षी कथ्थक नृत्याच्या उपासक भाग्यलक्ष्मी देशकर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला  मराठी भाषा दिवस अर्थात, कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांच्या जयंती दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नवोदिताच्या कलासाधक पुरस्काराचे हे पाचवे वष्रे आहे. यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी विलास उपाख्य नाना बोजावार, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं.श्याम गुंडावार, झाडीपट्टीतील ज्येष्ठ कलावंत व माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, चित्रकार चंदू पाठक यांना कलासाधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी कथ्थक नृत्य प्रकाराच्या उपासक भाग्यलक्ष्मी देशकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
देशकर या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरज तर्फे घेण्यात येणाऱ्या कथ्थक नृत्य प्रकारातील विशारद परीक्षा उत्तीर्ण आहेत. ललित कलेची पदव्युत्तर परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक येथून आचार्य पदवीसाठी त्या अभ्यासरत आहेत. चंद्रपुरात कथ्थक साधना केंद्र ही नृत्यशाळा त्या चालवितात. कथ्थक नृत्य प्रकाराच्या प्रचार व प्रसारासाठी गेल्या अनेक वर्षांंपासून त्या कार्यरत आहेत. कथ्थक नृत्याशी संबंधित अनेक कार्यक्रम त्यांनी स्वत: सादर केले आहेत व त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून त्या सतत कार्यक्रम सादर करतात.
चंद्रपुरात झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मरकडा शिल्पकलातील साहित्यिक आशय या विषयावर त्यांनी कथ्थक नृत्याच्या माध्यमातून सादर केलेल्या प्रयोगाचे कौतूक झाले होते. जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा सांस्कृतिक महोत्सवातही त्यांनी आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण केले होते. विविध सांस्कृतिक, सामाजिक संस्थेतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
 इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात २७ फेब्रुवारीला आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, उपाध्यक्ष अजय धवने, सचिव प्रशांत कक्कड, कोषाध्यक्ष आशिष अम्बाडे यांनी जाहीर केले आहे.