कुठे ‘यक्षाचं विरहगीत’, तर कुठे संस्कृत वाङ्मयाविषयी मार्गदर्शन, अशा पद्धतीने आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच कालिदास दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. दर्दी रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कणकवलीचे साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर व प्रसाद घाणेकर यांनी ‘यशाचं विरहगीत’ हा कार्यक्रम सादर केला. कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ खंडकाव्याची पहिली ओळ मन प्रफुल्लित करून टाकते. आपल्या कृषीप्रधान देशात पर्जन्याचे स्वागत करताना आषाढ मासाचे अनन्यसाधारण महत्त्व भारतीयांच्या मनात आजही असल्याचे त्यांनी सांगितले.घाणेकर यांनी सर्वाना समजेल अशा भाषेत एका जगप्रसिद्ध काव्याचा परिचय करून देणे हा अभिवाचनाचा उद्देश असल्याचे नमूद केले. भारत हे आपल्या देशाचे अधिकृत नाव संस्कृत आहे. आपली लोकसभा, आकाशवाणी, भारतीय नौदल, वायुदल, आयुर्विमा महामंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथील विद्यापीठांची बोधवाक्ये संस्कृतच आहेत. आपल्या देशाला सांस्कृतिक आधार देणारी ही प्राचीन, सुसंस्कृत तसेच उच्चारणशुद्धता आणणारी संस्कृत भाषा आणि वाङ्मय ही आपल्या देशाची दौलत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाकवी कालिदास यांच्या सर्वोच्च प्रतिभेचे स्वरूप ‘मेघदूता’तून दिसले. ‘यक्षाचं विरहगीत’अंतर्गत या खंडकाव्यातील निवडक ३२ श्लोकांचे पठण आणि या श्लोकांच्या कवी कुसुमाग्रजकृत अनुवादाचे वाचन अनुक्रमे डॉ. करंदीकर आणि घाणेकर यांनी केले. सूत्रसंचालन कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख श्याम पाडेकर यांनी केले.
‘कलाकार विचारमंच’चा कार्यक्रम
कलाकार विचारमंच या संस्थेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर झेंडे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल घोलप, अविनाश आहेर उपस्थित होते. प्रास्तविक लक्ष्मीकांत निकम, सूत्रसंचालन मोहन जगताप यांनी केले. घोलप यांनी महानगरपालिकेच्या सहकार्यातून कवी कालिदास यांचे यथोचित स्मारक उभारण्याचा प्रयत्न आगामी काळात निश्चितपणे केला जाईल, असे आश्वासन दिले. मधुकर झेंडे यांनी महाकवी कालिदास हा खऱ्या अर्थाने प्रेमकवी असल्याचे नमूद केले. ‘मेघदूत’सारख्या खंडकाव्यातून स्त्री सौंदर्याची जी तारीफ करण्यात आली आहे त्या तोडीचे लिखाण आजपर्यंत कोणीही केलेले नाही, असेही ते म्हणाले.