सामान्यांचे रोजचे जेवण महाग करणाऱ्या व ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांनाही रडवेले केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ व खराब हवामानामुळे कांद्याच्या पिकावर करपा व टक्का या रोगांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषधे फवारूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याने कांदाउत्पादक चांगलेच हवालदिल झाले आहेत. रोगांमुळे पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादन निम्म्याने घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘अट्टल जुगार’ (!) अशी ओळख असलेल्या या पिकाची स्थिती सध्या मात्र दयनीय झाली आहे. पावसाळा संपल्यापासून आजपर्यंत सतत टिकून राहणाऱ्या ढगाळ हवामानामुळे पिकावर करपा व टक्का रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. लागवडीनंतर वाढीची अवस्था सुरू होताच रोगांनी कांद्यावर हल्ला चढविला. शेंडय़ाकडून पिवळी पडून करपू लागलेल्या पातीमुळे कांद्याच्या वाढीवर विपरित परिणाम झाला आहे. पिकाची सर्वदूर वाढ खुंटली आहे. फवारणीनंतरही कांद्याचे पीक सावरत नसल्याने शेतकरी जेरीस आला आहे.
कमी कालावधीसह कमी खर्चात येणारे हे पीक असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे यंदा अधिक कल राहिला. जिल्हाभर सुमारे १५ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली. मागील सलग दोन वर्षे दुष्काळी स्थितीत पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचे पीक मोडीत काढले. त्यामुळे जिल्हाभर कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढले, असे कृषी विभागाकडून सांगितले जाते. ऑगस्ट, सप्टेंबरात होणाऱ्या कांदा लागवडीस रांगडा खरीप हंगाम मानले जाते. जिल्ह्यात याच हंगामात कांद्याची लागवड करण्याकडे अधिकतर शेतकऱ्यांचा ओढा आहे. परंतु पावसाळ्याच्या शेवटानंतर पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या ढगाळ हवामानाचा फटका या पिकास बसत आहे. पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दविबदूसह जाळधुईमधून करप्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कालपर्यंत हिरवेगार दिसणारे पीक रातोरात पिवळे पडत आहे. साहजिकच कांदाउत्पादक शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
महागडी औषधे फवारून रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करीत आहेत. एकेका शेतकऱ्याच्या किमान ३-४ फवारण्या झाल्या आहेत. मजुरी, औषधे मिळून एका फवारणीस सरासरी अडीच हजार रुपये खर्च येतो, असे तुळजापूरच्या अपसिंगा येथील शेतकरी संजय पाटील, विष्णू गुरव, सुग्रीव सुरडकर, नरसिंह पाटील, चंद्रकांत नरुळे आदींनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2013 रोजी प्रकाशित
कांद्यावर करप्याचा ‘प्रकोप’!
गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ व खराब हवामानामुळे कांद्याच्या पिकावर करपा व टक्का या रोगांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषधे फवारूनही हे रोग आटोक्यात येत नसल्याने कांदाउत्पादक चांगलेच हवालदिल झाले आहेत.
First published on: 09-11-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karapa diseas on onion crops