गेल्या रविवारी खापरी मार्गावरील आठ टँकर्सला लागलेल्या आगीने भविष्यातील भीषण संकटाचे संकेत दिले असून हे इंधन आगार तेथून त्वरित स्थानांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंबंधी चर्चा सुरू झाली असली तरी प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे कुंभकर्णी झोपेत आहे.
वर्धा मार्गावरील खापरी नाक्यापासून जवळच भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईलचे विस्तीर्ण आगार असून तेथे पेट्रोल, डिझेल, रॉकेल तसेच स्वयंपाकाच्या गॅसचा साठा केला जातो. रेल्वेने इंधन आल्यानंतर ते येथील मोठय़ा टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. स्वयंपाकाचा गॅस येथे सिलेंडरमध्ये भरला जातो आणि  सिलेंडर ट्रकमध्ये भरून तसेच पेट्रोल, डिझेल व रॉकेल टँकरमध्ये भरून ते मध्य भारतात रवाना केले जातात. सुटीचे दिवस सोडून चोवीसही तास हे काम येथे सुरू असते. मुळात महामार्ग, लोकवस्ती तसेच रेल्वे मार्गाजवळ गॅस, पेट्रोल, डिझेल व रॉकेलचा साठा नको, ही प्राथमिक गरज आहे. पूर्वी शहर येथून दूर होते. आता लोकवस्ती या आगाराच्या चोहोबाजूस वाढू लागली आहे. महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे इंधनाची गरजही वाढली असून परिणामी इंधन वाहून नेणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. रिकामे टँकर्स तसेच ट्रक यांची येथे नेहमीच गर्दी असते. इंधन आगारासमोर रस्त्याच्या कडेला ते अस्ताव्यस्त उभे असतात. मिहानकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाखालीही टँकर्स  तसेच जवळच असलेल्या जकात नाक्यासमोरही टँकर्ससह इतर वाहनांची गर्दी असते.  
या ज्वलनशील इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांना परिवहन मंत्रालयाकडून विशेष प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. केवळ दोन दिवसांचे हे प्रशिक्षण असते. वाहन चालविण्याचा परवाना असला तरी त्यांना हे प्रशिक्षण घ्यायला हवे.
प्रत्यक्षात त्याची ना वाहतूकदारांना ना चालकांना ना परिवहन खात्याला गरज वाटते. हे ट्रक एकमेकांना खेटून उभे असतात. रविवारी एकमेकांच्या अगदी जवळ असल्यानेच रांगेत आठ टँकर्स पेटले. या टँकरमध्ये फर्नेस ऑईल होते, अशी प्राथमिक माहिती आहे. वीज, दारुगोळा, साबण, कपडे धुण्याची भुकटी आदींसह विविध पदार्थाच्या उत्पादनात ते वापरले जाते. पेट्रोल, डिझेल व रॉकेलमध्ये या फर्नेस ऑईलची भेसळ केली जात असल्याचे लपून राहिलेले नाही. अन्न व नागरी पुरवठा खाते, पेट्रोलियम खाते तसेच पोलिसांनाही याची माहिती आहे. अनेकदा पोलिसांनी तेथे कारवाई केली आहे. मात्र, ‘अर्थपुरवठा’ वाढवला की भेसळीचा धंदा पुन्हा तेजीत येतो, असे लोक सांगतात. मुळात इंधनात भेसळीवर कारवाई करण्याची मूळ जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा खात्याची आहे. आधी त्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. किंवा त्यांनी तक्रार केल्यानंतर कारवाईसाठी पोलिसांचे सहकार्य घेता येऊ शकते.
वर्धा मार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका सादर झाली होती. या इंधन आगारासमोर वाहनांची वाढती गर्दी पाहता उपाययोजना ठरविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वीच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन एक सूचना केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. इंधन कंपन्यांनी योग्य उपाययोजना न केल्याने ही समस्या उद्भवली असल्याचा सूर त्या बैठकीत व्यक्त झाला होता. शहर तसेच डोंगरगावपासून थोडे दूर मोकळ्या जागेत टँकर उभे ठेवायचे. टँकर चालकांना एसएमएस देऊन एकेकाला आगारात पाचारण करायचे. त्याचप्रमाणे आगाराच्या कामकाजाच्या वेळेत वाढ करायची, आदी सूचना विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केली होती. सरकारी शिरस्त्याप्रमाणे त्यावर अद्यापही अंमल झालेला नाही.
लोकवस्ती वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खापरीचे इंधन आगार बोरखेडीजवळ स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव जुनाच   आहे.   त्यासाठी   पंधरा    एकरहून अधिक जागा इंधन कंपन्यांनी खरेदी करून ठेवली आहे.   मुंबईहून परवानगी येत नसल्याने हे घोडे अडले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी झालेल्या टँकर जळीतप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध तसेच ज्वालाग्राही पदार्थ असल्याचे माहिती असूनही ते सार्वजनिक ठिकाणी उभे केल्याबद्दल टँकर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
कुणीतरी टँकरला आग लावल्याची पोलिसांची शंका आहे.  स्फोटक तसेच परिवहन खात्याचे अधिकारीही घटनास्थळी येऊन गेले आणि त्यांनी पाहणी करून नमुनेही घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.