कुटुंबियांचा गेम करू, अशी धमकी
५० लाखाची खंडणी द्यावी, अन्यथा कुटुंबियांचा गेम करू, अशी धमकी देत एकाचे अपहरण करणाऱ्या चार जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातून अपहरण करताना संशयितांनी विरोध करणाऱ्या मुलीलाही शिवीगाळ केली.
या प्रकरणी दिंडोरी रस्त्यावरील पोकार कॉलनीत वास्तव्यास असलेल्या चंद्रकांत सोनवणे यांनी तक्रार दिली. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. शेखर राहुल निकम आणि संतोष विजय पगारे यांच्यासह चार संशयित बळजबरी घरात शिरले आणि सोनवणेंना सोबत चला म्हणून दमदाटी करू लागले. यावेळी मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिला शिवीगाळ केली. संतोष पगारेने पिस्तुलीचा धाक दाखवून चंद्रकांत सोनवणे यांना निळ्या रंगाच्या मोटारीत डांबले. यावेळी त्यांच्या एका साथीदाराला सोनवणेंच्या घरात बसविण्यात आले. संशयितांनी सोनवणेला दिंडोरीच्या पुढे उमराण्याला नेले. तिथे नेल्यावर संशयितांनी सोनवणेंना त्यांचा पुण्यात असलेला मुलगा अमोलशी संपर्क साधण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयितांनी त्याला धमकावून खंडणीची मागणी केली. आम्ही तुझ्या वडिलांचे अपहरण केले आहे.
तुझ्या घरी आमचा एक साथीदार बसला असून ५० लाख रूपये न दिल्यास वडिलांसह आई व बहिणीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या एकूणच प्रकाराने भयभीत झालेल्या अमोलने पैशांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवत वडिलांना सोडण्याची मागणी केली.
मुलाने पैशांची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविल्यानंतर मंगळवापर्यंत ही रक्कम द्यावी, असे संशयितांनी बजावले. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता सोनवणे यांना पुन्हा सोडून देण्यात आले.
या घटनाक्रमामुळे भयभीत झालेल्या सोनवणे यांनी पुण्याहून मुलगा आल्यावर पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले. परंतु, त्यांचा मुलगा आजारी असल्याने तो येऊ शकला नाही. यामुळे घटना घडून तीन दिवस उलटल्यानंतर या प्रकरणी अखेर त्यांनी तक्रार दिली. यावरून शेखर निकम, संतोष पगारे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित पंचवटीतील फुलेनगर येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण
कुटुंबियांचा गेम करू, अशी धमकी ५० लाखाची खंडणी द्यावी, अन्यथा कुटुंबियांचा गेम करू, अशी धमकी देत एकाचे अपहरण करणाऱ्या चार
First published on: 02-10-2013 at 08:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapping for fifty lakhs