मोठय़ा भावाला जाळून मारणाऱ्या मुकेश पावरा यास येथील न्यायालयाने जन्मठेप सुनावली. न्या. आर. आर. कदम यांनी हा निर्णय दिला.
३ सप्टेंबर २०१२ रोजी शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथे ही घटना घडली होती. चत्तरसिंग पावरा यांना तीन मुले आहेत. त्यापैकी मोठा सुनील केंद्रीय राखीव पोलीस दलातून सुटी घेऊन घरी आला होता. त्यांचा लहान भाऊ मुकेश हा गावातच राहात होता. तर सर्वात लहान भाऊ हा शिक्षक असून तो बाहेरगावी राहतो. मुकेशने तीन सप्टेंबर २०१२ रोजी शेतातून भुईमुगाच्या शेंगा तोडून आणल्यानंतर त्या अंगणात वाळण्यासाठी टाकल्या होत्या. या शेंगा पावसात भिजल्यामुळे वडील चत्तरसिंग त्याला रागावले. त्यामुळे संतप्त झालेला मुकेश काही वेळानंतर मद्यधुंद होऊन आला. त्याने वडिलांसोबत वाद घातला. मनस्ताप झाल्यामुळे चत्तरसिंग यांनी घरात जाऊन दार लावून घेतले. स्वत:वर रॉकेल शिंपडू लागले. त्यामुळे सुनील पावरा यांनी घरात जाऊन त्यांच्याकडून कॅन हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत रॉकेल सुनील आणि चत्तरसिंग या दोघांवर सांडले. त्याचवेळी मुकेश तावातावाने घरात आला. ‘मीच तुम्हाला पेटवितो’ असे म्हणत त्याने पेटती काडी जमिनीवर फेकली. या घटनेत सुनील व चत्तरसिंग दोघेही भाजले. या घटनेनंतर शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
सुनीलला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २० सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण धुळे न्यायालयात गेले होते. याप्रकरणी मुकेश पावराला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षांची कैद सुनावण्यात आली.