सदृढ पैलवानांसाठी कोल्हापूरचे नांव देशभर प्रसिध्द आहे. तसेच कुपोषणमुक्त जिल्हा म्हणूनही कोल्हापूर जिल्ह्य़ाचे नांव देशभर होणे आवश्यक आहे. जिल्हा कुपोषण मुक्त होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी सोमवारी केले.
राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेला आज सुरूवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. १४४ गावे व १०३७ अंगणवाडय़ा कुपोषणमुक्त असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘पावनखिंड’ या मासिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, की जिल्हा शाश्वत कुपोषणमुक्त करण्यासाठी गर्भवती मातांना पोषक आहार देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. कुपोषण मुक्तीसाठी कृती आराखडा बनविला जात आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमामध्ये लोकसहभाग वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
कार्यशाळेत जिल्हा परिषद सदस्य परशुराम तावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, जिल्हामाहिती अधिकारी डॉ.नांद्रेकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने उपस्थित होते. बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती भाग्यश्री गायकवाड यांनी आभार मानले.