ठाणे पूर्व आणि पश्चिम विभागात होणारी वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी संध्याकाळी दिली.
जागर फाऊंडेशनच्या वतीने मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित ‘संजय उवाच’ या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि रंगकर्मी विजू माने यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी कोपरी पुलाच्या कामाविषयी माहिती दिली. काही वर्षांपूर्वी या कामाचा खर्च १२ कोटी होता, दिरंगाईमुळे तो आता ५० कोटी रुपये झाला आहे. खर्च शंभर कोटींच्या घरात जाण्याआधी हे काम पूर्ण व्हायला हवे, असेही केळकर यांनी सांगितले.
ठाणे शहरातील पायाभूत प्रकल्प, प्राथमिक सुविधा आणि विकास योजनांविषयी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची आमदार केळकर यांनी उत्तरे दिली. ठाणेकरांना सुविधांची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. सहा महापालिका असलेला ठाणे हा एकमेव जिल्हा असूनही मुंबईच्या तुलनेत ठाण्याला सापत्नपणाची वागणूक देण्यात येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे हे मुंबईप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेगाने वाढत असल्याने ठाण्यालाही तोच दर्जा मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहीन, ठाणे हे शैक्षणिक केंद्र बनण्यासाठी लागणारा पाठपुरावा करीत राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. इतरांप्रमाणे बॅनरबाजी करून शहर विद्रूप करणार नाही, अशी खात्रीही त्यांनी नागरिकांना दिली. जागर फाऊंडेशनच्या गौरव सोहळ्यात ठाण्यातील उत्कृष्ट नगरसेवकांचा व सामाजिक संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.