बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेले, आई अंगणवाडी ताई, दहावीपर्यंतचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत. हा क्रांती काशिनाथ डोंबे या युवतीचा भूतकाळ आहे, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यातून मुलींमध्ये जिल्हा उपनिबंधकाच्या यादीत पहिली येण्याचा मान तिने मिळवला, हा तिचा लखलखता वर्तमानकाळ आणि तिच्याच तोंडून ऐकायचे तर तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे, हा तिच्यासमोरचा दुर्दम्य भविष्यकाळ!
शनिवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जिल्हा उपनिबंधक, सहायक विक्रीकर आयुक्त, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांसह अन्य पदांसाठीची ही परीक्षा होती. या परीक्षेत ४६४ गुण मिळवून क्रांती काशिनाथ डोंबे ही राज्यात जिल्हा उपनिबंधकांच्या यादीत मुलीतून प्रथम आली. तीन महिन्यांपूर्वीच औरंगाबाद येथे विक्रीकर निरीक्षकपदावर रुजू झालेल्या क्रांतीचा आधीचा प्रवास मात्र खडतर आणि अवघड वाटावळणांचा आहे. पाथरी तालुक्यातल्या हदगाव येथे क्रांतीची आई अंगणवाडी ताई आहेत. अवघ्या दोन वर्षांची असताना क्रांतीचे वडील मृत्यू पावले. घरातल्या कर्त्यां पुरुषाचे छत्र निघून गेल्यानंतर आईवरच सर्व जबाबदारी येऊन पडली. पहिली ते दहावीपर्यंत क्रांतीचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच वेळी क्रीडाशिक्षक असलेल्या कैलास माने यांनी तिच्यातील जिद्द हेरली होती. क्रांतीमध्ये आत्मविश्वास आहे, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची जिद्द आहे, मुख्य म्हणजे आव्हानांना तोंड द्यायला तिला आवडते, असे माने यांनी जाणले.
हादगावची शाळा दहावीपर्यंतच होती. २००४ मध्ये दहावी झाल्यानंतर क्रांतीचे पुढील शिक्षण जिजाऊ ज्ञानतीर्थ या निवासी गुरुकुलात झाले. परिस्थिती हलाखीची, अशा वेळी सर्व शिक्षकांनीच तिला आर्थिक मदत केली. कला शाखेत मराठवाडय़ातून द्वितीय येऊन त्या वेळी तिने आपला विश्वास सार्थ ठरवला. बारावीनंतर डी. एड. पूर्ण करून शिक्षकासाठीची पात्रता परीक्षा ती उत्तीर्ण झाली. जिंतूर तालुक्यातल्या कोक येथे तिला नोकरीची संधी मिळाली, पण ध्येय मोठे बाळगायचे या जिद्दीने झपाटलेल्या क्रांतीने केवळ शिक्षकपदावर समाधान मानले नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने थेट पुणे गाठले. तीन महिन्यांपूर्वीच विक्रीकर निरीक्षक या पदावर क्रांती औरंगाबादला रुजू झाली. दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आला आणि ती आता जिल्हा उपनिबंधक या पदाकरिता उत्तीर्ण झाली आहे. या पदासाठीच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान तिने मिळवला आहे. रविवारी तिने उपजिल्हाधिकारी या पदासाठीही परीक्षा दिली. पेपर सोडविल्यानंतरचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. अर्थात केवळ उपजिल्हाधिकारी होऊनही तिला थांबायचे नाही. तर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.
क्रांतीची आई विमलबाई या हादगाव येथेच अंगणवाडी ताई आहेत. आपल्या या यशात आईच्या परिश्रमाचा वाटा ती अत्यंत कृतज्ञतेने नमूद करते. कैलास माने यांच्यासारखे शिक्षक जर मिळाले नसते तर ही धडपड सार्थकी लागली नसती. या यशात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे, असेही क्रांतीने सांगितले. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास खूप असतो, पण शहरात गेल्यानंतर हे वातावरण त्यांना सुरुवातीच्या काळात आपले वाटत नाही. आपण खेडय़ातून आल्याने सर्वच बाबतींत मागास आहोत, ही सलही सुरुवातीला असतेच. पण त्यावर मात करता आली पाहिजे. आपला भविष्यकाळ आपल्यालाच घडवायचा असेल तर आधी स्वत:तले सामथ्र्य ओळखले पाहिजे आणि नंतर आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, असे क्रांतीचे ठाम मत आहे. तिच्या बोलण्यातूनही हा आत्मविश्वास शब्दाशब्दांतून जाणवत होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दैनिक ‘लोकसत्ता’ची खूपच मदत झाल्याचेही तिने अभिमानाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
जि.प.च्या शाळेतील विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींत पहिली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४६४ गुण मिळवून क्रांती काशिनाथ डोंबे ही राज्यात जिल्हा उपनिबंधकांच्या यादीत मुलीतून प्रथम आली
First published on: 03-02-2014 at 02:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kranti dombe first in girls in mpsc