कोणत्याही अभिनेत्रीच्या वयाच्या भानगडीत पडायचे नसते. त्यामुळे क्रांती रेडकरचे खरे वय ते काय याचाही शोध का घ्यावा? पण तिने राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘कुणी घर देता का घर’ या चित्रपटात चक्क सत्तर वर्षांच्या महिलेची (वृद्धेची कसे म्हणायचे?) भूमिका साकारली आहे.
याबाबत ती सांगत होती, या चित्रपटातील माझ्या व भरत जाधवच्या भूमिकेचा प्रवास तारुण्याकडून वृद्धापकाळापर्यंत शहराकडून ग्रामीण जीवनापर्यंत असा आहे. त्यातील हा सत्तरी गाठलेल्या स्त्रीचा भाग कसा बरे साकारायचा याबाबत मी थोडी साशंक होते, पण भरत म्हणाला आपण अनेक प्रकारच्या भूमिका साकारतो, अनेक रूपे घेतो तसेच हे रूप घेतो. मला माझ्या दोन्हीकडच्या आजी-आजोबांचा प्रत्यक्षात लाभ झाली नाही, त्यामुळे अशा वयाची माणसे कशी वागतात वा विचार करतात याचा मला काहीच अनुभव नव्हता. पण ही सत्तर वर्षांच्या स्त्रीची भूमिका साकारण्याच्या निमित्ताने मला विजू खोटे, दीपक शिर्के, सविता मालपेकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान अशा अनेक बुजुर्ग कलाकारांसोबत काम करताना बरेच काही जाणून घेता आले, क्रांती रेडकर म्हणाली. या चित्रपटाची पटकथा वाचतानाच मी खूप हसले असेही तिने सांगितले.