नागपूर सुधार प्रन्यासच्या शाखा अधिकारी अनिता देवघरे यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुरुवारी, आझाद नगरातील सलीम खान यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार आज नियोजनबद्ध सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
नासुप्रच्या अखत्यारितील वैशालीनगरातील एनआयटी मैदानात मे महिन्यात भरलेल्या प्रदर्शन व मेळ्यात स्टॉल लावण्यासाठी सलीम खान यांनी परवानगी मागितली
होती. त्यासाठी अग्रीम म्हणून ६९,५२७ रुपये जमा केले होते. प्रदर्शन संपल्यानंतर त्यापैकी ६५,७४० रुपये धनादेशाद्वारे परत मिळणार होते. हा धनादेश काढून देण्यासाठी नासुप्रच्या शाखा अधिकारी अनिता देवघरे (५०) यांनी २ हजार रुपयांची मागणी केली. सलीम खान यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक निशीथ मिश्र यांच्या नेतृत्त्वात उपअधीक्षक हरिश्चंद्र रेड्डीवार, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, अशोक देवतळे, हवालदार संजय ठाकूर, सुभाष तानोडकर, चंद्रशेखर ढोक, अमीत डहारे व महिला शिपाई प्रमिला गायकवाड आणि चालक संतोष मिश्रा यांनी सापळा रचला.
सलीम खान यांनी अनिता देवघरेंशी संपर्क साधून लाच देण्याची तयारी दर्शविली. पैसे घेऊन येत असल्याचे त्यांनी कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दिलेल्या विशिष्ट नोटांचे बंडल घेऊन ते देवघरेंकडे गेले. ही लाच स्वीकारत असतानाच अधिकारी आत शिरले आणि अनिता देवघरे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
देवघरे यांनी बराच शाब्दिक वाद घातल्याचे कळते. मात्र, महिला पोलीस शिपायाच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. अनिता देवघरे नागपूर सुधार प्रन्यासच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही मोठय़ा प्रमाणावर अडवणुकीच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
नासुप्रतील महिलाअधिकारी लाच घेताना रंगेहाथ अटकेत
नागपूर सुधार प्रन्यासच्या शाखा अधिकारी अनिता देवघरे यांना २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुरुवारी, आझाद नगरातील सलीम खान यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार आज नियोजनबद्ध सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

First published on: 01-12-2012 at 06:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladies officer arrested while taking bribe