लोकसभा निवडणूक काळात प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदार जागृतीच्या अभियानाची लाट संपूर्ण देशभर पसरली होती. उत्साहात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तरुणांनी मतदानाला उदंड प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मदत केली. मात्र त्या वेळीही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक चांगला प्रतिसाद होता. ग्रामीण भागात ६० टक्के, तर शहरी भागांमध्ये जेमतेम ४० टक्के मतदान झाले होते. किमान विधानसभा निवडणुकीत तरी मोठय़ा संख्येने मतदानाचा हक्क बजावून शहरी भागातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यास मदत करावी, असे आवाहन शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था तसेच जागृत नागरिकांनी केले आहे.
देशभरातील सर्वाधिक दाट लोकवस्तीच्या ठाणे जिल्ह्य़ामध्ये जिल्हा विभाजनानंतर पहिल्यांदाच मतदान होत आहे. या वेळी पालघरचे मतदार वेगळे झाले असून तेथील मतदानाचा टक्का ठाण्याच्या तुलनेत नेहमीच चांगला राहिला आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये येथील टक्केवारी नेहमीच कमी राहिलेली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ही जिल्ह्य़ातील शहरे सुशिक्षित, सुनियोजितेचा टेंभा मिरवत असले तरी येथील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल मात्र कमालीची अनास्था असते; तर याउलट पालघर, शहापूर, मुरबाडसारख्या ग्रामीण भागामध्ये मात्र याउलट चित्र असून तेथे  ६० टक्क्यांपर्यंत मतदान होते. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे यंदाही एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदान वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली होती. तोच उत्साह यंदाही कायम राहील, अशी अपेक्षा शासकीय यंत्रणा बाळगून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००९ विधानसभा निवडणूक टक्केवारी
भिवंडी ग्रामीण – ५६.६५%
शहापूर – ६४.९८%
भिवंडी पश्चिम – ४४.०९%
भिवंडी पूर्व – ४०.०७%
कल्याण (प.) – ४४.९५%
मुरबाड – ६१.३४%
अंबरनाथ- ३८.५९%
उल्हासनगर- ३७.०८%
कल्याण (पू.)-४५.९२%
डोंबिवली-४३.६०%
कल्याण (ग्रा)-४७.१७%
मिरा-भाइंदर- ४४.९५%
ओवळा-माजिवडा-४६.८३%
कोपरी-पाचपाखाडी- ५०.९५%
ठाणे-५१.५३%
मुंब्रा-कळवा-४७%
ऐरोली- ४९.८४%
बेलापूर- ४६.७१%

सुशिक्षितपणा मतपेटीतून दाखवा
सांस्कृतिक शहर, सुशिक्षित शहर, सुनियोजित शहर असा टेंभा मिरवणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना आपले हे सुधारलेपण मतपेटीतून दाखवण्याची गरज आहे. कारण २००९ मध्ये डोंबिवलीमध्ये केवळ ४३.६० टक्के मतदान झाले होते. कल्याण पश्चिमेत ४४.९५ तर कल्याण पूर्वमध्ये ४५.९२ टक्के मतदान झाले होते. ऐरोली आणि बेलापूरमध्ये अनुक्रमे ४९.८४ आणि ४६.७१ इतके अल्प मतदान झाले होते, त्यामुळे या मतदारसंघामध्ये १०० टक्के मतदानाचा विक्रम करून आपला सुशिक्षितपणा दाखवण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lets vote thane
First published on: 15-10-2014 at 06:19 IST