नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठया लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आज, शुक्रवारी सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावू शकतील. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख कर्मचारी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळतील.

या टप्प्यात १३४ महिलांसह १,६२५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास न होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे.

१९ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघांत जय्यत तयारी

* पहिल्या टप्प्यात देशभरात १०२ मतदारसंघांपैकी ७३ खुल्या गटातील तर अनुसूचित जातींसाठी ११ व अनुसूचित जमातींसाठी १८ मतदारसंघ राखीव आहेत.

* अरुणाचल आणि सिक्कीममधील ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होईल.

* मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल.

* पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये ८.४ कोटी पुरुष, ८.२३ कोटी महिला व ११ हजार ३७१ तृतीयपंथीय आहेत.

* ३५.६७ लाख प्रथम मतदार आहेत. २०-२९ वयोगटातील ३.५१ कोटी युवा मतदार आहेत.

* ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाडया व सुमारे १ लाख वाहने निवडणूक व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी तैनात केली आहेत.

तर राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी मतदान होत आहे. नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे, रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे, गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार  आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर भंडारा-गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे.