काळी जादू करत असल्याच्या संशयावरून एका महिलेची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
जयलाल मोहन नेताम असे आरोपीचे नाव असून तो देवरी येथील रहिवासी आहे. मनसीरबाई मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. ७ ऑगस्ट २००९ रोजी मनसीरबाई ही कामावर जाऊन सायंकाळी ६.३० वाजता घरी आली होती. यानंतर आरोपी तिच्या घरी गेला व तिला प्रचंड शिवीगाळ केली. मनसीरबाई काळी जादू करीत असल्यामुळे आपल्या मुलीची प्रकृती बिघडली असल्याचे तो म्हणत होता. भांडण सुरू असतानाच आरोपीने मनसीरबाईवर विळ्याने वार करून घटनास्थळीच ठार केले. यावेळी मनसीरबाईचा पती बाहुरसिंग हा मधात आला असता त्यालाही आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर आरोपीने विळ्यासह पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
याप्रकरणी देवरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट केले. गोंदिया सत्र न्यायालयाने ६ मे २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ४४७ अंतर्गत ३ महिने सश्रम कारावास, तर कलम ५०६ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील विविध बाबी तपासून आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. सरकारतर्फे अ‍ॅड. विनोद ठाकरे यांनी युक्तिवाद केला.