प्रसूतीनंतर दवाखान्यातच स्वत:च्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या निर्दयी मातेस गंगाखेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गंगाखेड तालुक्यातील तांदूळवाडी येथील द्रौपदी मरीबा साबने (वय २५) हिने राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १३ मे २००७ रोजी मुलीस जन्म दिला. द्रौपदी ही पोट दुखत असल्यामुळे दवाखान्यात आली होती. तेव्हा प्रसूतीच्या कळा येत असल्याने पोट दुखत असल्याचे डॉ. फारूख मणियार यांनी सांगितले. त्यामुळे तिला दवाखान्यात दाखल करून घेण्यात आले. तिने एका मुलीस जन्म दिला. परंतु दुसऱ्या दिवशी दवाखान्यातच या मुलीचा द्रौपदीने गळा दाबून खून केला व मृतदेह दवाखान्यात सोडून पोबारा केला.या प्रकरणी डॉ. मणियार यांच्या तक्रारीवरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात द्रौपदीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
 जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधार भारस्वाडकर यांनी आरोपी द्रौपदीस जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. भगवानराव यादव यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सूर्यकांत चौधरी यांनी सहकार्य केले.