बॉलीवूडमध्ये बहुतांशी नायककेंद्री गोष्ट असलेले चित्रपट केले जात असून त्याची संख्या प्रचंड आहे. पुरुष व्यक्तिरेखांना मध्यवर्ती ठेवूनच सिनेमाचे लेखन केले जातेय. त्याचबरोबर सिनेमातून दाखविले जाणारे महिलांविषयीचे चित्रण चांगल्या पद्धतीने केले जात नाही. म्हणूनच आता आपण स्त्रीकेंद्री चित्रपट करण्याचे ठरविले आहे, असे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कूकनूर यांनी म्हटले आहे.
‘हैद्राबाद ब्ल्यूज’, ‘डोर’, ‘मोड’ तसेच ‘इकबाल’ यांसारख्या चित्रपटांमुळे नावाजले गेलेले दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्या चित्रपटांतून त्यांनी स्त्री व्यक्तिरेखांना खूप महत्त्व दिले आहे. नागेश कूकनूर यांनी ‘लक्ष्मी’ हा नवीन चित्रपट बनविला असून तो बालवयात वेश्याव्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या मुलीच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अभिनेत्री शेफाली शहा आणि अभिनेता राम कपूर व अन्य नवीन चेहरे ‘लक्ष्मी’ या चित्रपटात असून चित्रपट प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरविलेली नाही. परंतु, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठविण्यात येणार असल्याचे कूकनूर यांनी सांगितले.
अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम असे स्टार अभिनेते वगळता अन्य कोणत्याही स्टार अभिनेत्यांना घेऊन कूकनूर यांनी सिनेमा केलेला नाही. याबद्दल छेडले असता ते म्हणाले की, पटकथेची आवाका मोठा असेल.
कथानक पडद्यावर मांडण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागणार असेल तर मग सिनेमाला न्याय देण्यासाठी बडे कलावंत, स्टार कलावंतांना घेणे आवश्यक ठरते अन्यथा नाही.
आपण आतापर्यंत जवळपास प्रत्येक प्रकारचा चित्रपट केला असून ‘रोड मुव्ही’ हा प्रकार आणि मारधाडपटाच्या प्रकारचा सिनेमा केलेला नाही. ‘८७१०तसवीर’ या चित्रपटात थोडीफार मारामारी होती. परंतु, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारची कथानके सारख्याच प्रमाणात आपण रूपेरी पडद्यावर मांडली आहेत, असा दावाही नागेश कुकनूरने केला आहे.