व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही खात्यात तब्बल २ कोटी रुपये जमा
स्थानिक संस्था कराला व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध झाल्यानंतरही महापालिकेच्या खात्यात एलबीटीचे तब्बल दोन कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर महापालिका ही राज्यात एका महिन्यात सर्वाधिक एलबीटी वसूल करणारी ठरली आहे. यातही पेट्रोल पंप व मद्यविक्रेत्यांनी सर्वाधिक कर जमा केलेला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर वसूल झाल्याने नवीन वर्षांत ही शुभवार्ता ठरली आहे.
 राज्य शासनाने १ नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश महानगरपालिकेत स्थानिक संस्था कर लागू केलेला आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांकडून हा कर वसूल करण्यात येणार आहे. आयकर, व्हॅट, सेल टॅक्समुळे आधीच त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांनी एलबीटी कर लागू होताच त्याला कडाडून विरोध केला होता. सलग दहा दिवस व्यापारपेठ बंद होती. त्याचा परिणाम केवळ दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. व्यापारी एलबीटीच्या विरोधात आहेत, हे बघून महापालिकेकडे व्यापाऱ्यांची नोंदणी होणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते, परंतु आयुक्त प्रकाश बोखड यांनी स्वत: पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांची मार्गदर्शनपर शिबिरे गेतली.  त्यानंतरही नाराजीचा सूर होता, मात्र महापालिकेने सक्ती करून व्यापाऱ्यांना तातडीने एलबीटीची नोंदणी करण्याचे आवाहन केल्यानंतर आठवडय़ाभरात जवळपास २८०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केली, तसेच शहरातील अ‍ॅक्सिस, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, अशा सहा बॅंकांमध्ये खातीही उघडली. या सर्व खात्यांमध्ये ३१ डिसेंबपर्यंत तब्बल दोन कोटी रुपयांवर  एलबीटीची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक एलबीटी जमा करणारी चंद्रपूर ही एकमेव पालिका ठरली असल्याची माहिती आयुक्त प्रकाश बोखड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
आताही शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटीसाठी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्वरित नोंदणी करा, अन्यथा दहा पट दंड वसुलीची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. औद्योगिक जिल्हा, अशी ओळख असलेल्या या शहरात पेट्रोलपंप संचालक व मद्यविक्रेत्यांनी सर्वाधिक एलबीटी जमा केलेला आहे. त्या खालोखाल दुचाकी व चारचाकी गाडय़ांच्या शो-रूम संचालकांनी कर जमा केला. महापालिकेने किमान तीन कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज व्यक्त केला होता, परंतु स्थानिक उद्योजकांनी एलबीटी अजूनपर्यंत भरलेला नाही. त्यामुळे आता पालिकेचे अधिकारी स्थानिक उद्योगांच्या मागे लागणार आहेत. पालिका हद्दीत येणाऱ्या सर्व उद्योगांकडून एलबीटी वसुली केली जाणार आहे.
लातूर, परभणी व भिवंडी येथे एकाच वेळी एलबीटी लागू करण्यात आला होता, मात्र तेथील व्यापाराच्या तुलनेत चंद्रपुरात सर्वाधिक एलबीटी भरण्यात आलेला आहे. येत्या काळात या रकमेत दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक संस्था करामुळे नवीन वर्षांत पालिकेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
महागाई वाढली
स्थानिक संस्था करामुळे महानगरपालिका क्षेत्रात महागाई भरमसाठ वाढली आहे. पेट्रोल व मद्याच्या किमतीत तर चांगली वाढ झालेली आहे. यासोबतच वाहन खरेदी, भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, मोटरसायकल, कार, हॉटेल व सर्व वस्तूही महागलेल्या आहेत.