चांदवड, सिन्नर, येवला, निफाड, देवळा
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरूवारी उघडीप घेतली. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर येथील तुरळक पावसाचा अपवाद वगळता या काळात उर्वरीत तालुक्यात पावसाची नोंद झालेली नाही. या हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत १५,८३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण इतके दिसत असले तरी पाच तालुक्यात मात्र अजुनही पावसाची गरज आहे.
गणेशोत्सवापासून दाखल झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच हात दिला आहे. प्रारंभीच्या टप्प्यात जिल्ह्यातील जो भाग टंचाईच्या छायेत सापडला होता, त्याची त्याने सुटका केली. मागील आठ ते दहा दिवसांपासून अधुनमधून नित्यनेमाने हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरूवारी विश्रांती घेतली. मागील काही दिवसांपासून कायम राहिलेले ढगाळ वातावरण या दिवशी दूर झाले. शहरासह अनेक भागात ऊन पडले होते. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात मागील चोवीस तासात २२ (आतापर्यंत ३६४८ मिलीमीटर ) पावसाची नोंद झाली. नाशिक ० (६८२), दिंडोरी १ (८८२), पेठ ० (२२६०), त्र्यंबकेश्वर ४ (२०५७), मालेगाव ० (५६३), नांदगाव ० (४९५.८), चांदवड ० (४४१), कळवण ० (६१३), बागलाण ० (५९९), सुरगाणा ० (१८००), देवळा ० (४१७), निफाड ० (४६४), सिन्नर ० (५०५), येवला ० (४१०) अशी पावसाची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास चांदवड, सिन्नर, येवला, निफाड, देवळा हे तालुक्यात त्याचे प्रमाण कमी राहिल्याचे लक्षात येते.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने तीन ते चार धरणांचा अपवाद वगळता समाधानकारक जलसाठा झाला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण जवळपास पूर्ण भरले आहे. तशीच स्थिती दारणा, गौतमी-गोदावरी, काश्यपी, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, भावली, वालदेवी व आळंदी धरणांसह आदी धरणांची आहे. जिल्ह्यातील केवळ गिरणा, नागासाक्या व तिसगाव धरणात अद्यापही अत्यल्प जलसाठा आहे. परतीच्या पावसाने धरणांची पाणी पातळी उंचावण्यास हातभार लावला आहे.