सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत. यासाठी वर्षभरात अगदी कमी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या शोधात हे कर्मचारी सध्या गुंतले आहेत. घरोघरी सिलिंडर पोहोचविणारे कर्मचारी अनेक वेळा हेराफेरी करून ग्राहकांचा सिलिंडर भलत्यालाच दामदुपटीने विकून मोकळे होतात. कर्मचाऱ्यांच्या या उपद्व्यापामुळे नोंदणी नोंदणी करूनही वेळेत सिलिंडर न आल्यामुळे ग्राहक मेटाकुटीस येतो. एजन्सीच्या कार्यालयात जावे तर तेथील कर्मचारी उलटसुलट उत्तरे देतात. ‘घरचा सिलिंडर घेऊन या आणि भरलेला सिलिंडर घेऊन जा’ असे फर्मानच ते सोडतात. अडलेला ग्राहक गुमान स्वत: सिलिंडर घेऊन येतो आणि भरलेला घेऊन जातो. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. काही वेळा एखाद्या ग्राहकाच्या नावाने सिलिंडरची नोंदणी केली जाते. परंतु ग्राहकाला मात्र त्याची कल्पनाच नसते. त्याच दरम्यान त्याच्या घरचा सिलिंडर संपला आणि नोंदणीसाठी तो एजन्सीत गेला तर तुमचा सिलिंडर घरी पोहोचता झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात त्यांचा सिलिंडर भलत्याच व्यक्तीला विकलेला असतो. आता प्रत्येकाला वर्षांकाठी सवलतीच्या दरात केवळ सहा सिलिंडर देण्याच्या घोषणेमुळे काळाबाजार करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. आपल्या यादीतील मंडळींना सिलिंडर कसा द्यायचा अशा विवंचनेत ते पडले आहेत. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी संगनमत करून वर्षभरात कोण किती सिलिंडर घेतो याची माहिती ते काढत आहेत. एकटे-दुकटे राहणारे ग्राहक या कर्मचाऱ्यांच्या रडारवर असून अशा ग्राहकांची यादी तयार केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2012 रोजी प्रकाशित
एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान!
सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत.
First published on: 08-11-2012 at 02:13 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low usage gas consumer be alert