गॅस पुरवठाधारक कंपन्यांनी ग्राहकांना ‘केवायसी’ अर्ज बंधनकारक केल्याने हे अर्ज घेऊन भरून देण्यासाठी गॅस ग्राहकांची गर्दी होत आहे. या वर्षांतील अनुदानाच्या दरातील तीन गॅस सिलिंडर मार्चपर्यंत ग्राहकांना मिळणार आहेत.
 १४ सप्टेंबरनंतर २१ दिवसांप्रमाणे ३१ मार्चपर्यंत पहिले ३ सिलेंडर अनुदानाच्या दरात मिळणार आहेत. त्यानंतर कंपनीच्या आर्थिक वर्षांनुसार एप्रिल ते मार्चपर्यंत सहा सिलेंडर अनुदानाच्या दरात व उर्वरित सिलेंडर खुल्या दरानुसार ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहेत. अनुदानाच्या सिलेंडरचा दर ४३९ रुपये असून, बिगरअनुदानाच्या सिलेंडरचा दर जागतिक बाजारपेठेतील क्रुड तेलाच्या मूल्यावर आधारित राहणार आहे. अनुदान व गॅस पुरवठा नियंत्रित राहावा म्हणून कंपन्यांनी ग्राहकांना केवायसी अर्ज बंधनकारक केले आहे.
  १ सप्टेंबरपासून केवायसी भरून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर असून अर्जातील माहिती संकलित करून ती कंपनीकडे संग्रहित राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या नावाने गॅस वापरणाऱ्यांवर व गॅस उपलब्ध करणाऱ्यांवर वचक राहणार असून एकाच ग्राहकांच्या नावे जास्त जोडणी असणारे ग्राहक उघडे पडणार आहेत. तसेच सिलेंडरचा  पुरवठा सुरळीत राहू शकणार आहे. केवायसी अर्जात ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकेचा खाते क्रमांक लिहिणे आवश्यक असून न लिहिल्यास सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाची गरज नाही, असे समजण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज घेण्यासाठी व देण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे.