अमेरिका व ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत उद्या, ८ ऑक्टोबरला खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून भारतात ते खंडग्रास व छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. विदर्भात मात्र अगदी चंद्रोदयाच्या वेळी सायंकाळी ६ वाजता अल्पकाळ खंडग्रास व ७ वाजेपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. ही नियमित व खगोलीय घटना असल्यामुळे लोकांनी अंधश्रद्धा न मानता चंद्रग्रहण पाहावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुप या खगोलीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
अमेरिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, व्हिएतनाम, क्युबा, फिलीपिन्स आदी देशांत खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून भारतासह ब्राझील, चिली, व्हेनेझुअला, बांगलादेश येथे मात्र खंडग्रास आणि छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.४५ वाजेपासून ग्रहणाला सुरुवात होणार आहे आणि खग्रास स्थिती ४ ते ५ वाजेपर्यंत राहणार आहे. खंडग्रास ग्रहण संध्याकाळी ६.०२ वाजता संपेल व छायाकल्प चंदग्रहण ७.०२ वाजेपर्यंत राहील. पूर्व भारतातील लोकांना खंडग्रास तर मध्य भारतातील लोकांना अंशत: खंडग्रास व छायाकल्प चंदग्रहण दिसणार आहे. चंद्र उगवतानाच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला येथून अल्पकाळ खंडग्रास, छायाकल्प चंदग्रहण दिसणार आहे. चंद्रोदय ५.५३ वाजता होणार असल्यामुळे विदर्भातून उंच टेकडय़ांच्या ठिकाणी जाऊन पाहिल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाचा शेवट चांगला पाहता येईल. अनेक लोक ग्रहणात अंधश्रद्धा पाळतात. ते चुकीचे असून अंधश्रद्धा न मानता ग्रहण पाहावे असे आवाहन या संस्थेने केले आहे.
चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या छायेतून जात असल्यामुळे ग्रहण होते. जिथे चंद्र गडद छायेने झाकला जातो तिथे खग्रास, जिथे चंद्र पूर्ण झाकल्या जात नाही तिथे खंडग्रास तर जिथे विरळ छाया दिसते तिथे छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हटले जाते. पुढील खग्रास चंद्रग्रहण १५ एप्रिल, कंकणाकृती सूर्यग्रहण २९ एप्रिल तर २३ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपतर्फे देण्यात आली आहे.