महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बुधवारी २६ तारखेला आयोजित करण्यात आला असून त्यात २०११-१२ व २०१२-१३ या दोन सत्रातील एकूण ७८५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जातील. त्यात ६३८ पशुवैद्यकीय विज्ञान, ८४ पदव्या दुग्ध तंत्रज्ञान तर ६३ पदव्या मत्स्यविज्ञान विद्या शाखेतील असल्याचे कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्य व्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. गुरुबचनसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होईल. पशुवैद्यकीय विज्ञान शाखेतील ३१९ स्नातक, ३०१ स्नातकोत्तर तर १८ आचार्य पदव्या प्रदान केल्या जातील. दुग्धतंत्रज्ञान विद्या शाखेत ८४ स्नातक, मत्स्यविज्ञान शाखेत ६३ स्नातक पदव्या दिल्या जाणार आहेत. पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्यविज्ञान या अभ्यासक्रमांना मुलींची संख्या वाढत असून यंदा या कार्यक्रमात एकूण पदव्यांपैकी तीस टक्के पदव्या मुलींना प्रदान केल्या जातील, हे विशेष.
दीक्षात कार्यक्रमात पदव्यांशिवाय प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या तीनही विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना एकूण ३२ पदके बहाल केली जातील. ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या विद्यापीठाच्या दुग्ध तंत्रज्ञान शाखेतील एका विद्यार्थिनीला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या एकूण १४ सुवर्ण पदकांपैकी एकूण सहा सुवर्ण पदके मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या नमिता नितीन नाडकर्णी या विद्यार्थिनीने पटकाविले. मुंबईच्या अमृता वसंत पालकर, सोहल रुही रणबीरसिंह, नागपूरच्या कैलास इनानिया, नेत्रा बाबुराव अस्वार यांनी प्रत्येकी एक तर नागपूरचा बाबुलाल कुमावत व उद्गीरच्या सचिन श्रीराम सानप यांनी प्रत्येकी दोन पदके पटकावली. पशुवैद्यक शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या एकूण पाच सुवर्ण पदके राजलक्ष्मी बेहरा, प्रियंका पुरुषोत्तम भिवगडे, उर्वशी वर्मा, पांडुरंग कोकणे, लक्ष्मण नारायण सुपणे यांनी पटकाविली. उत्तीर्ण परंतु कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यावर पदके पाठविली जातील.