एकेकाळी औद्योगिक कामगारांची जीवनदायिनी ठरलेले परळ परिसरातील कामगार राज्य विमा योजनेचे महात्मा गांधी रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालय प्रशासनाकडूनही ते पूर्ववत करण्यासाठी फार काही प्रयत्न केले जात नसल्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाने त्याविरोधात तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.  
संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सचिव सुनील बोरकर, लक्ष्मण तुपे, साई निकम, संघटन सचिव एम. पी. पाटील आदींच्या शिष्टमंडळाने नुकतीच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. निमिष शहा यांची भेट घेऊन रुग्णालय पूर्ववत चालविण्याची मागणी केली. त्यावर रुग्णालय पूर्ववत करण्याचे आश्वासन डॉ. शहा यांच्याकडून देण्यात आले. त्यानंतर  आश्वासनाची पूर्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा युनियनतर्फे देण्यात आल्याचे युनियनने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
महात्मा गांधी रुग्णालय तीन महिन्यांपासून बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि रुग्णालयाचा फक्त बाह्य रुग्ण विभाग सुरू आहे. कामगार रुग्णांना तात्पुरती औषधे देऊन घरी पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णालयातील सर्व विभाग ओस पडलेले आहेत. शिवाय पुरेशी औषधेही दिली जात नाहीत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रव्यवहाराद्वारे या मुद्दय़ाकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर काहीही प्रतिसाद देण्यात आला नाही. या पाश्र्वभूमीवर संघाच्या शिष्टमंडळाने डॉ. शाह यांची भेट घेतली. त्या वेळी निधीअभावी रुग्णालयातील विविध विभाग बंद करण्यात आल्याची माहिती डॉ. शहांकडून देण्यात आली. त्याला युनियनने तीव्र आक्षेप नोंदवत कुठलीही पूर्वकल्पना न देता हा घेण्यात आलेला हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालय प्रशासनाकडून कामगार रुग्णांचे योग्य सेवेअभावी कसे हाल करण्यात येत आहे, याचीही माहिती दिली. त्यावर १५ दिवसांत रुग्णालय पूर्ववत करण्याचे आश्वासन रुग्णालयातर्फे देण्यात आले. मात्र या आश्वासनाचे पालन करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा युनियनने दिला आहे.