महावितरणमार्फत मध्यंतरी वीज मीटर बदलविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ग्राहकांच्या घरातील जुने मीटर्स काढून त्या जागी नवीन मीटर्स बसविण्यासाठी महावितरणने खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. हे काम करताना महावितरणने ग्राहकांना माहिती होईल, असे कोणतेच पाऊल उचलले नव्हते. त्यामुळे ही मोहीम सुरू आहे व ती महावितरणचीच आहे, हेही लोकांना माहिती नव्हते. याचा गैरफायदा कंपनीच्या कंत्राटदाराच्या लोकांनी घेतला व ग्राहकांची फसवणूक केली. नवीन मीटर बसविल्यावर त्यांनी ग्राहकांकडून अनेक ठिकाणाहून पैसे घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
महावितरणने नंतर ही मोहीम केव्हा बंद केली, हेही लोकांना कळले नाही. त्याचाही गैरफायदा या मोहिमेची माहिती असणाऱ्या लोकांनी घेतला. बहुतांश हे लोक त्या कंपनीशी निगडित असावेत, असे बोलले जात आहे. सुरुवातीला जेव्हा नवीन मीटर बसविण्याची मोहीम सुरू होती तेव्हा कंपनीच्या लोकांनी ग्राहकांच्या अज्ञानाचा व कायद्याला घाबरण्याच्या मन:स्थितीचा गैरफायदा घेत नवीन मीटर बसविल्यानंतर अनेक ठिकाणी ग्राहकांकडून भरपूर रक्कम उकळली व वीज ग्राहकांनीही कुठलीही शहानिशा न करता त्यांना पैसे दिले. ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला त्या विद्युत ग्राहकांना अश्लील भाषेत बोलण्यास खासगी कं पनीच्या लोकांनी कमी केले नाही. मोहीम अचानक बंद झाल्यावर काही लोकांनी पुन्हा त्या परिस्थितीचा गैरफायदा घेत वीज ग्राहकांना लुबाडले. काही ठिकाणाहून जेव्हा त्यांच्याविरुद्ध आक्रोश झाला तेव्हा त्यांनी पोबारा केला. सर्व झाल्यावर आता वीज मंडळाच्या महावितरण विभागाने एक निवेदन जारी करून कुठल्याही स्वयंघोषित मध्यस्थाशी संपर्क करू नका. काही तक्रार असल्यास अधिकृत तक्रार यंत्रणांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यास महावितरण तत्पर आहे तेव्हा वीज ग्राहकांनी कुठलीही तक्रार असल्यास मध्यस्थाकडे न जाता महावितरणच्या अधिकृत यंत्रणेकडे दाद मागावी वा ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे तक्रार करावी, असा सल्ला या निवेदनातून दिला आहे. या ठिकाणीही तक्रारींचे निवारण झाले नाही तर विदर्भ व मराठवाडय़ातील वीज ग्राहकांनी नागपूर येथील विद्युत लोकपालाकडे तक्रार करण्यास सांगितले आहे. कुठलीही मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यास ज्या खासगी कंपनीला कोमाचे कंत्राट दिले जाते त्या लोकांना वीज कंपनीचेही ओळखपत्र देणे आवश्यक असून त्यांना वीज ग्राहकांनी पैसे देऊ नयेत, अशा सूचनाही देणे जरुरी आहे, अशी मागणी फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी केली आहे.