‘राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ’ असे जाहीररित्या दिंडोरी मतदारसंघाचे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीकाळी केले असले तरी आता तो सुरक्षित राहिला नसल्याची जाणीव त्यांनाही झाल्यानेच त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते प्रचारासाठी या मतदारसंघात ठाण मांडणार आहेत. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करावी यासाठी अजूनही जिल्हा भाजपचे प्रयत्न सुरू असून मोदींची सभा झाल्यास आपले काम अधिक सोपे होईल, असा दावा चव्हाण यांच्याकडून केला जात आहे.
दिंडोरी मतदारसंघात एकूण दहा उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढाई राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण या दोन दिग्गजांमध्येच होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच या दोन्ही उमेदवारांचे समर्थक विजयाचे दावे करीत असले तरी विजयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नसल्याची जाणीव दोन्ही पक्षांना झाली आहे. विशेष म्हणजे कार्यकर्ते आणि नेते यांच्या भूमिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल झालेला दिसून येत आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांचे मतदारसंघातील नेते एकत्र आल्याचे चित्र दिसत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांची भूमिका वेगळीच असल्याचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
डॉ. भारती पवार यांच्यामुळे चव्हाण यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले असले तरी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात असलेली नाराजी आणि मोदी यांच्याविषयी जनतेत असणारे आकर्षण यांच्या जोरावर चव्हाण यांची बाजू बळकट असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत चव्हाण यांच्या मताधिक्यात वाढच होत असल्याचे मागील निकालांवरून दिसून येते.
२००४ मध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन चव्हाण हे ४४५० मताधिक्य घेऊन कसेबसे विजयी झाले. तिरंगी लढतीत धर्मनिरपेक्ष जनता दलाचे हरिभाऊ महाले यांनी चव्हाण यांच्या तोंडाला फेस आणला होता.
चव्हाण यांना त्यावेळी दोन लाख १८ हजार १२९ मते मिळाली होती. तर, महाले यांना दोन लाख १३ हजार ५७९ मते मिळाली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिवा पांडू गावित यांनी एक लाख १३ हजार ३८६ मते घेऊन चव्हाण आणि महाले या दोघा उमेदवारांना चांगलेच झुंजविले होते. २००४ मध्ये केवळ नशिब बलवत्तर म्हणून विजय पदरी पडलेल्या चव्हाण यांनी २००९ मध्ये मात्र सर्वानाच चकित केले.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चारीमुंडय़ा चीत करून त्यांनी आपल्या अंगी निवडणूक जिंकण्याचे कसब असल्याचे दाखवून दिले. बारामतीनंतर संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून स्वत: पवार यांनी दिंडोरीचा उल्लेख केला होता. परंतु त्यांचा हा विश्वास साफ खोटा ठरवित मतदारांनी चव्हाण यांच्या पदरात दोन लाख ८० हजार ९४४४ मतांचे दोन टाकले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवळ यांचा त्यांनी ३७ हजार ५२ मतांनी दणदणीत पराभव केला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जे. पी. गावित यांनी एक लाखावर मते घेऊन मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते.
चव्हाण यावेळी हॅट्रीक करण्यासाठी रिंगणात असून मोदी लाटेमुळे त्यांचे मताधिक्य अधिक वाढण्याची शक्यता भाजपच्या नेक्तायंकडून व्यक्त होत असताना राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांच्यामागे आघाडीचे सर्वच नेते ठामपणे उभे राहिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्टय़े म्हणजे डाव्या आघाडीकडून जे. पी. गावित हे रिंगणात नाहीत. तर, त्यांच्याऐवजी वाघेरे हे उमेदवारी करत असून उत्तम अभ्यास असलेले वाघेरे सर्व समस्यांची खास आपल्या ग्रामीण ष्टाईलमध्ये मांडणी करतात. तेव्हा उपस्थितांवर त्यांचा चांगलाच प्रभाव पडतो. परंतु मतदारसंघाच्या ठराविक भागापुरताच डाव्या आघाडीचा जोर असल्याने चव्हाण आणि पवार यांच्यापैकी ते कोणाला अधिक त्रासदायक ठरतात. आणि गावित यांच्यापेक्षा अधिक मते मिळवितात काय हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
दिंडोरी मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विरुद्ध आघाडीचे नेते
‘राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ’ असे जाहीररित्या दिंडोरी मतदारसंघाचे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीकाळी केले असले तरी आता तो सुरक्षित राहिला नसल्याची जाणीव
First published on: 17-04-2014 at 09:01 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti against congress ncp leaders in dindori