पत्नी आपल्यावर जादूटोणा करते, असा संशय घेऊन कुऱ्हाडीने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गोरेगाव येथील पांडुरंग मंगरू काटेवार (६०) हा घटनेच्या दोन वर्षे आधीपासून पत्नीपासून वेगळ्या घरातच आपल्या आईसोबत राहायचा. तो पत्नी रेशमनबाई हिच्यावर जादूटोण्याचा संशय घेत होता. याच संशयातून २ फेबुवारी २०१२ रोजी सकाळी ७.३० वाजता त्याने आपल्या पत्नीला कुऱ्हाडीच्या दांडय़ाने मारले. त्यात ती बेशुद्ध झाल्यावर त्याने सिलपाटा तिच्या डोक्यावर मारला. यात ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेदार टोम्पे यांनी केला. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. न्या. आर. जी. अस्मार यांनी या प्रकरणातील आरोपी पांडुरंग काटेवार याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात या घटनेचे प्रत्यक्षदर्शी प्रेमलाल वडगाये, सेवंताबाई वडगाये, पुष्पाबाई राऊत व मृताची मुलगी पंचफुला काटेवार यांनी दिलेल्या साक्षीवरून आरोपी पांडुरंग काटेवारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तपास ठाणेदार टोम्पे यांनी केला. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. वीणा बाजपेई यांनी फिर्यादीची बाजू मांडली.