विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नांदगाव मतदारसंघात तसेच मनमाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचे कौतुक होण्याऐवजी ही कामे संशयाच्या घेऱ्यात अडकली असून इतके दिवस काहीही न करता हे आताच का, असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे.
पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून मनमाडकर हे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. कधी १५, कधी २८ तर, कधी ५५ दिवसाआड पाणीपुरवठा झाल्याने मनमाडकरांना टंचाईची एकप्रकारे सवय झालेली. परंतु निवडणुकीच्या तोंडावर नवी पालखेड योजना पूर्ण होत असल्याचे सांगत शहराला अचानक सात दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागला. यावर्षी पुरेसा पाऊस नसताना आणि वाघदर्डी धरण अद्याप बरेच रिकामे असताना सात दिवसाआड पाणीपुरवठा कसा सुरू झाला, निवडणुकीनंतर ही स्थिती कायम राहील काय, उपलब्ध पाणीसाठा वर्षभर पुरेल काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्ताधारी गट आणि नगरसेवकांकडून याबाबत कितीही स्पष्टीकरण देण्यात येत असले तरी सात दिवसाआड पाणी पुरवठय़ाबाबत मनमाडकरांच्या मनात शंका कायम आहे.
पालिकेतर्फे ऐन निवडणुकीच्या उंबरठय़ावर शहरात प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी खड्डे असताना गुणवत्ता कशी तपासली, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरच शहरांतील स्वच्छता, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पालिकेतर्फे ५० लाख रुपये खर्चुन अद्ययावत यंत्रणा व सुमारे ५० ते ६० ठिकाणी कचराकुंडय़ा बसविण्याची व्यवस्था करण्यात आली. आधुनिक यंत्रणेव्दारेा कुंडय़ांमधील कचरा स्वयंचलित पद्धतीने काढला जाणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अशी साफसफाई कशी सुरू झाली, याबाबत मनमाडकरांना आश्चर्य वाटत आहे. शहरांतील कैकाडी महाराज उद्यानही निवडणूक जवळ आल्यावरच खुले करण्यात आले. या उद्यानात अद्याप साफसफाई नाही. खेळणीही नाहीत. बसण्यासाठी बाकडे नाहीत. बहुतेक वेळा ते बंदच असते. त्यामुळे त्याचे लोकार्पण करण्यात आले असले तरी मनमाडकरांच्या सध्या तरी ते उपयोगाचे नाही. नेहरू गार्डनही शॉपींग सेंटरचा अडथळा असल्यामुळे काही वर्षांपासून बंदच आहे. कैकाडी उद्यानही खुले करण्यात आल्याबद्दल मनमाडकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
मनमाडचे भारनियमन हा तर अत्यंत संवेदनशील विषय. भारनियमनाचा खाक्या सकाळ, दुपार, सायंकाळ असा सुरूच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही विकास कामे, मोठय़ा इमारती किंवा इतर सोयीसुविधा या विषयांवर होणार नसून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या समस्यांभोवतीच प्रामुख्याने फिरणारी राहणार आहे. समाज माध्यमांव्दारे सर्वसामान्य मनमाडकर आपल्या मनातील भावनांना वाट करून देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
मनमाडमध्ये.. ‘हे आताच का’ या प्रश्नाने सत्ताधारी अडचणीत
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नांदगाव मतदारसंघात तसेच मनमाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचे कौतुक होण्याऐवजी ही कामे संशयाच्या घेऱ्यात अडकली असून
First published on: 20-09-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad civilian raise question on development work of ruling party