आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, उपलब्ध झालेल्या निधीमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे आरोग्य कमालीचे सुधारले असून या ठिकाणी भेट देणाऱ्यास आपण जणू खासगी रुग्णालयात वावरत असल्याची अनुभूती मिळत आहे. चकचकीत कक्ष, स्वच्छता व टापटीप, रुग्णांना भेटण्यासाठी निश्चित झालेली विशिष्ट कालमर्यादा, वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत ठेवली जाणारी देखरेख.. असे अनेक बदल प्रकर्षांने लक्षात येतात. विशेष म्हणजे, रुग्णांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र आहार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या बदलांमुळे या ठिकाणी उपचारास दाखल होणाऱ्या गोरगरीब रुग्णांना सुखद धक्का बसला आहे.
एरवी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि त्याची विदारक अवस्था हा सर्वाचा चर्चेचा विषय. रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही स्थिती अंगवळणी पडलेली. सार्वजनिक ठिकाण म्हणजे नागरिकांना हवे तसे वागण्यास मिळालेली मुभा हा गैरसमज जिल्हा रुग्णालयाने मोडीत काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अस्ताव्यस्त लावलेली वाहने, रुग्णांच्या नातेवाइकांचा जत्था, आतमध्ये प्रवेश केल्यावर येणारा दरुगधीयुक्त वास, पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाईकांना मिळणारी तुच्छतेची वागणूक हे चित्र सवयीचे होऊन गेले होते. त्यात आमूलाग्र बदल घडवत आरोग्य व्यवस्थेचा एक चांगला चेहरा सर्वासमोर जावा याचा विचार कधी झाला नाही. सिंहस्थासाठी मिळालेल्या निधीतून त्या अनुषंगाने प्रथमच विचार झाला असून त्याचे प्रतिबिंब रुग्णालयाच्या बदललेल्या रूपात दिसत आहे.
सिंहस्थ निधीचे योग्य नियोजन करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयात अनेक बदल घडवून आणले आहेत. रुग्णालयाचे तिन्ही मजले अत्याधुनिक फरशांनी चकचकीत झाले आहे. त्यांच्या स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने सफाई केली जाते. स्वच्छतागृहात मुबलक पाणी असून अन्य काही सोयी पुरविल्या आहेत. रुग्णांना आल्हाददायक वाटावे यासाठी पडदे, चांगल्या स्वरूपातील ब्लँकेट, चादर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी रुग्णाचा आहार-विहार कसा असावा या संदर्भातील फलक, विविध शासकीय योजना याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांचा रुग्णालयात असणारा अहोरात्र वावर पाहता खासगी रुग्णालयाप्रमाणे त्यांना ठरावीक तास रुग्णांना भेटण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालयातील गर्दीवरही नियंत्रण आले आहे.
व्यवस्थापनाने जळीत कक्ष अत्याधुनिक पद्धतीने साकारला आहे. याशिवाय बालकक्षाची सुधारणा करताना ठिकठिकाणी कार्टून्स, लहान मुलांची खेळणी यांची बेगमी करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या भिंती सुरक्षित राखण्यासाठी आता थुंकणाऱ्याला २०० रुपये दंड भरावा लागेल, असा इशारा फलकाद्वारे सूचित करण्यात आला आहे. प्रत्येक खोलीत तसेच खोलीबाहेर तंबाखु तसेच गुटखा यांची दानपेटी ठेवण्यात आली आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे जिल्हा रुग्णालयास ‘कॉपरेरेट लुक’ प्राप्त झाला आहे.

रुग्णांसाठी खास ‘आहार कक्ष’
रुग्णांच्या आरोग्यासाठी रुग्णालयात आहार कक्षाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून रुग्णांचा आजार, त्याची शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन आहार ठरवून दिला जातो. त्यासाठी आहारतज्ज्ञ कुपोषित, गर्भवती तसेच अन्य रुग्णांची तपासणी करत त्यांना याबद्दलची माहिती देत आहे. या सगळ्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक चमूसह अचानक कुठल्याही विभागाचा दौरा करतात. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याची कानउघाडणी करण्यात येत आहे. रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी चौफेर प्रयत्न सुरू असताना काही ठिकाणी भंगार साहित्य मात्र ‘जैसे थे’ अवस्थेत आहे.