जून संपण्याच्या मार्गावर असताना अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे. रिक्त होणाऱ्या धरणांची संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही धास्तावली आहे. या पाश्र्वभूमीवर, नाशिक महापालिकेने शहरात त्वरित पाणी कपात लागू करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या गावांची संख्या महिन्यात दुपटीने वाढली असून सध्या एकटय़ा नाशिक जिल्ह्यात १७८ गावे आणि ३४६ वाडय़ांना १६० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या शिवाय, धुळे जिल्ह्यात ८ गावांना तर जळगावमधील चार गावांना टँकरने पाणी पुरविले जाते. मान्सून लांबल्याने पेरण्यांची कामे रखडली असून हा हंगाम संकटात सापडण्याची धास्ती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
पाच महिन्यांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या सातत्याने बसणाऱ्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतीला नव्याने उभारी देण्यासाठी खरेतर पावसाचे वेळेवर आणि समाधानकारक आगमन होणे अपेक्षित होते. परंतु, जवळपास संपूर्ण महिना त्याच्या प्रतिक्षेत गेला. जूनच्या अखेरीस उत्तर महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा अधिक धरणांनी तळ गाठला असून अन्य प्रकल्पांचे त्याच दिशेने वेगाने मार्गक्रमण होत आहे. जून कोरडा गेल्यामुळे अनेक गावे व वाडय़ांना टँकरने पाणी पुरविणे भाग पडले आहे. पावसाचे आगमन आणखी लांबल्यास बिकट स्थितीला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये एकूण १७ पैकी कडवा, मुकणे, भोजापूर, तिसगाव, कश्यपी व गौतमी-गोदावरी ही सहा धरणे कोरडीठाक पडली आहेत. या व्यतिरिक्त १० धरणांत एक ते नऊ टक्क्यांपर्यंत जलसाठा असल्याने ती कधीही रिक्त होतील अशी स्थिती आहे. त्यात दारणा धरणात ४७७ दशलक्ष घनफूट (६.६७ टक्के), पालखेड ३१ (४.१३), करंजवण ४३६ (८.११), ओझरखेड १०७ (५.०४), वाघाड २१ (०.८२), पुणेगाव ६ (०.९०), वालदेवी ९ (०.००८) आणि भावली ३० (२.०९) या धरणांचा समावेश असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या धरणांमधून शेती व पिण्यासाठी पाणी दिले जाते. अखेरच्या टप्प्यात तळाचे पाणी घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याने ते गाळमिश्रित राहण्याची शक्यता आहे.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २२१९ दशलक्ष घनफूट (३९.४१ टक्के) जलसाठा राहिल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. गंगापूर धरणातील जलसाठ्याचे महापालिकेने १५ ऑगस्टपर्यंत नियोजन केले आहे. परंतु, तोपर्यंत अथवा त्यापुढील काळात मान्सून लांबल्यास अथवा त्याचे प्रमाण कमी झाल्यास पुढील काळात गंभीर स्थिती उद्भवू शकते. नाशिककरांसह सिंहस्थ कुंभमेळ्यावरही त्याचा विपरित परिणाम होवू शकतो. यामुळे महापालिकेने त्वरित शहरात पाणी कपात लागू करावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील टंचाईचे संकटाने भयावह स्वरुप धारण केले आहे. नाशिक जिल्ह्यात मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये टँकरने पाणी द्याव्या लागणाऱ्या गावांची संख्या दुपटीने वाढली. सध्या १७८ गावे व ३४६ वाडय़ांना १६० टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे टंचाई शाखेकडून सांगण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. धुळे जिल्ह्यात आठ गावांना सात तर जळगाव जिल्ह्यातील चार गावांन तीन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात अद्याप पाण्याचा एकही टँकर सुरू नाही. धुळे जिल्ह्यातील ४७ पैकी २७ हून अधिक लघूप्रकल्प कोरडे पडले आहेत. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात समाधानकारक जलसाठा आहे. परंतु, १५४ गावे आणि चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या शहरांची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात केवळ सात टक्के जलसाठा आहे. पारोळा तालुक्यातील बोरी धरण रिक्त आहे.
पावसाचे नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे आगमन न झाल्यामुळे टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या गावांच्या संख्येत अधिकच वाढ होण्यासोबत शेतीचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या घडामोडींचा विपरित परिणाम खरीप हंगामावर होईल अशी धास्ती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत करून शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. नाशिक विभागात (अहमदनगरसह) यंदा खरीप हंगामासाठी २८ लाख ३७ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्टय़े आहे. त्यात अन्नधान्य पिकाचे १४ लाख ९० हजार ३०० हेक्टर, गळीत धान्य दोन लाख, ८२ हजार, २००, कापूस नऊ लाख १५ हजार ६००, ऊस एक लाख ४९ हजार ८०० हेक्टर यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता कापूस, सोयाबीन, कांदा ही महत्वाची पिके असून त्यांचे क्षेत्रही मोठे आहे. मूग व उडीद पिकांची पेरणी लवकर करावी लागते. पावसाला आणखी विलंब झाल्यास त्यांचे क्षेत्र कमी होईल. सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा यांची विलंबाने पेरणी झाल्यास खरीपाचा हंगाम लांबला जाईल. परिणामी, टोमॅटो, कोबी आदी भाजीपाला पिकांची पुनर्लागवड अडचणीत येईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. खान्देशात ज्या शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड केली, त्यांच्यावर पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
पाऊस नसल्याने दुहेरी मार
जून संपण्याच्या मार्गावर असताना अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईच्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले आहे.
First published on: 27-06-2014 at 07:14 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many problems arrives due to no rain