मराठी भाषा दिन आला, की एका दिवसापुरते मराठीच्या प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या महाराष्ट्रात मराठी भाषा भवनाचे स्वप्न मात्र वर्षभरानंतरही लोंबकळतच राहिले आहे.  मुंबईत रंगभवन येथे ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षी विधिमंडळात केलेली घोषणा ‘बोलाचा भात’च ठरली आहे.  मराठी भाषा भवनाची साधी वीटही अद्याप रचली गेलेली नाही.
मराठी भाषेच्या संदर्भात काम करणारे सर्व विभाग एकाच छत्राखाली एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याच्या घोषणा राज्य सरकारने गेल्या दीडदोन वर्षांत वारंवार केल्या. गेल्या वर्षी रवींद्र नाटय़ मंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या शासकीय योजनांचा पाढा वाचला, तेव्हा मराठीप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाटही केला होता. वांद्रे येथील रंगभवनच्या परिसरात मराठी भाषा भवन उभे राहणार आणि मंत्रालयासमोर लक्तरे लेऊन उभ्या असलेल्या माय मराठीला स्वतचे घर मिळणार या कल्पनेने मराठी मने हरखून गेली होती.. या मराठी भाषा भवनात राज्य शासनाचे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे सर्व विभाग हातात हात घालून एकत्र काम करणार अशी योजनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र, अजूनही हे सारे विभाग आपापल्या टीचभर छपराखाली, एकमेकांकडे पाठ करूनच आपापले व्यवहार पार पाडत आहेत.   गेल्या वर्षभरात भाषा भवनाच्या उभारणीचे केवळ प्रशासकीय कागदी घोडे इकडून तिकडे नाचले. ज्या जागेत हे मराठी भाषा भवन बांधले जाणार आहे, त्या रंगभवनाची जागाही अद्याप ताब्यात आली नसल्याने इमारत तर दूरच, साधे भूमिपूजन किंवा एक वीटही रचली गेलेली नाही. दरवर्षीप्रमाणे उद्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा होईल, पुन्हा मराठी भाषा भवनाच्या जुन्या घोषणा नव्या दमाने दिल्या जातील, पुन्हा टाळ्यांचे कडकडाट होतील आणि ‘नेमेचि येतो..’ या उक्तीप्रमाणे सारे पहिल्यासारखेच सुरू राहील, अशी खंत मराठी भाषा प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

‘जागा ताब्यात आली की लगेच’..
गेल्या वर्षभरामध्ये मराठी भाषा भवन उभारण्याच्या दृष्टीने आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते आणि आहेत. आता प्रत्यक्ष जागा ताब्यात घेणे आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरच मराठी भाषा भवन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल.
वरिष्ठ अधिकारी (मराठी भाषा विभाग)

नाकर्तेपणातही सातत्य!
मराठी भाषा भवन बांधण्याची घोषणा करणे आणि पुढे काहीही न होणे यात नवीन काही नाही. राज्य शासनाच्या नाकर्तेपणातही सातत्य आहे. मराठी भाषा भवन बांधण्याची घोषणा करून त्यानंतर अन्य भाषकांच्या दबावापुढे झुकून मराठी भाषा भवनाऐवजी त्याचे नाव ‘भाषा भवन’ करणे हे त्याचेच ठळक उदाहरण आहे. -प्रा. दीपक पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 आम्हीही वाट बघतोय..
मराठी भाषा भवनात विश्वकोश मंडळाच्या कार्यालयाचे लवकरात लवकर स्थलांतर होऊन मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही विभागांचे येथे एक विस्तारित कुटंब व्हावे. याची विश्वकोश मंडळाचे सर्व कर्मचारी वाट पाहात आहेत.
डॉ. विजया वाड
अध्यक्ष- राज्य विश्वकोश मंडळ