आजकाल आपल्या बोलण्यात म्हणींचा वापर कमी झाला असला तरी काही वर्षांपूर्वी घरातील मंडळी, विशेषत: ज्येष्ठ मंडळी बोलण्यात म्हणींचा मोठय़ा प्रमाणात वापर करत असत. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेला हा मराठी भाषेतील प्रकार आता माहितीच्या महाजालात आला आहे.
वेगवेगळी संकेतस्थळे किंवा ब्लॉगवर असंख्य मराठी म्हणी आणि त्याचा अर्थही देण्यात आला आहे. मराठीचा अभ्यास करणारे पदव्युत्तर व शालेय विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो तयार संदर्भ ठेवा  झाला आहे. कमीतकमी शब्दांत परिस्थितीचा अन्वयार्थ किंवा नेमके भाष्य या म्हणींद्वारे केले जाते. केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्येही म्हणींचा वापर केलेला आहे. म्हणी म्हणजे त्या भाषेचे सौदर्य असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सध्याचा जमाना स्मार्ट भ्रमणध्वनीचा आहे. अ‍ॅड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या भ्रमणध्वनीसाठी ‘मराठी म्हणी’या नावाचे खास अ‍ॅप्स तयार करण्यात आले असून ते गुगल प्लेवरून डाऊनलोड करता येऊ शकते. तर mhani.tripod.com या संकेतस्थळावर आठवणीतल्या मराठी म्हणींची साठवण करण्यात आली आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे येथे एका पाटीवर अ ते ज्ञ पर्यतची अक्षरे देण्यात आली असून आपल्याला पाहिजे त्या अक्षरावर क्लिक केले की त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या म्हणी पाहायला मिळतात. येथे एक हजारांहून अधिक म्हणींचा संग्रह आहे. मराठी म्हणी आणि त्यांचा अर्थ udays1blog.blogspot.in  या संकेतस्थळावर वाचायला मिळतो.
आत्ताच्या काळात अनेक पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. तसेच काही अपवाद वगळता घरातूनही मराठी संस्कृती, भाषा, साहित्य, मराठी अवांतर वाचन कमी होत चालले आहे. अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मराठी म्हणींचे जतन आणि प्रसार केला जात असून तो नक्कीच स्वागतार्ह असल्याचे मत मराठी अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.     
म्हणींसाठीची अन्य काही  संकेतस्थळे
http://www.marathimandali.com
m4maharashtra.com
http://www.mhani.marathifanbook.com
sngrahit.blogspot.in
marathiblogs.net