जालना : उद्योगांची गरज आणि वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठय़ात वाढ करण्यासाठी जालना येथील औद्योगिक वसाहतीतील लोखंडी सळया तयार करणारे चार उद्योग पुढे आले आहेत. यापैकी एका उद्योगाचा हवेतून प्राणवायू घेणारा प्रकल्प उभा राहिला असून अन्य तीन प्रकल्प या महिन्याच्या शेवटापर्यंत उभे करण्याचे प्रयत्न आहेत.

दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्राणवायूची गरजही वाढली. राज्यात करोना विषाणू संसर्गाची लागण झाल्यावर वर्षभरापूर्वी जालना जिल्हा नियोजन समितीचा निधी, आरोग्य विभाग आणि स्थानिक लोकसहभागातून स्वतंत्र करोना समर्पित रुग्णालय उभे राहिले. नंतर जिल्हा रुग्णालयाचे रूपांतरही करोना रुग्णालयात झाले. या ठिकाणी प्रारंभी द्रवरूप प्राणवायूचा एक प्रकल्प वर्षभरापूर्वीच उभा राहिला. त्यानंतर स्थानिक उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीतून द्रवरूप प्राणवायूचा आणखी एक प्रकल्प उभा राहिला. आता जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हवेतून प्राणवायू घेणारा आणखी एक प्रकल्प उभा राहणार आहे.

स्थानिक लोखंडी सळया उद्योगाच्या प्रक्रियेसाठी प्राणवायूची आवश्यकता असते. परंतु करोना रुग्ण वाढल्यानंतर या उद्योगातील तीन द्रवरूप प्राणवायूचे प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवण्याचे आदेश दिले. हे उद्योग स्थानिक पातळीवर जेथून द्रवरूप प्राणवायू घेत होते त्या दोन उद्योगांवर र्निबध घालण्यात येऊन तेथील द्रवरूप प्राणवायू तसेच निर्मित होणारा प्राणवायू करोना उपचारासाठीच देण्याचे र्निबध घालण्यात आले.

या निर्णयामुळे लोखंडी सळया उद्योजकांनी हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प उभारण्याचे विचार सुरू केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या लोखंडी सळया उत्पादकांच्या बैठकीत या उद्योगांची गरज आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प उद्योजकांनी उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार एका उद्योगाने अठरा दिवसांत असा प्रकल्प उभा केला.

येथील पोलाद उद्योगातील हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांनी कमी वेळेत कोईम्बतूर येथून संबंधित यंत्रसामग्री आणली. सध्या या प्रकल्पातून जालना जिल्हा रुग्णालयातील करोना रुग्णांसाठी विनामूल्य प्राणवायू पुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातून परभणी जिल्हा रुग्णालयासही प्राणवायू पुरवठा करण्यात आला आहे. कालिका, एसआरजे आणि ओम साईराम हे तीन स्थानिक लोखंडी सळया उत्पादक उद्योगही असे प्रकल्प उभारीत आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय, जालना शासकीय स्त्री रुग्णालय, अग्रसेन भवन  करोना उपचार केंद्र, अंबड व राजूर येथील शासकीय रुग्णालयात हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

– रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना.