मराठवाडय़ाचा हजारो कोटींचा अनुशेष बुडवून, आता अनुशेष संपला असल्याची सरकारची भाषा आहे. पण सरकारचे हे धोरणच मराठवाडय़ातील जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.
राज्यात दुष्काळ तीव्र झाला असताना सरकार निव्वळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करीत आहे. दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेने स्वतंत्र मदतकार्य सुरू केले आहे. गरजूंना टँकरद्वारे पाणीवाटप केले जात आहे. जनावरांना चारा, धान्यवाटप सुरू आहे. आवश्कतेनुसार िवधनविहिरी घेतल्या जात आहेत. शिवसेना केवळ सामाजिक बांधिलकीपोटी दुष्काळ निवारणार्थ कार्य करीत आहे. दुसरीकडे सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मराठवाडय़ाच्या अनुशेषाबाबत अत्यंत चुकीची माहिती राज्य सरकारकडून सांगितली जात आहे. दिशाभूल करून अनुशेष संपल्याचे जाहीर केले जात आहे. विरोधी पक्षनेते सुभाष देसाई यांना विधानसभेत हा प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
युतीच्या राजवटीत राबविलेल्या कल्याणकारी योजना काँग्रेस आघाडीने बंद केल्या. त्यामुळे राज्याला त्याचा फटका बसल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. शिवसेना सत्तेवर आल्यानंतर मराठवाडयाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्यास प्रभावी उपाययोजना आखल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उस्मानाबादचा पाणीप्रश्न आमदार ओमराजे निंबाळकर यांनी विधानसभेत गाजविला. पण शिवसेना श्रेयासाठी काम करीत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार आजच उस्मानाबादेत लोकार्पण सोहळा करीत आहेत, यावर ओमराजे यांना खुणावत त्यांनी या नेत्यांची खिल्ली उडविली.
परंडा येथील जाहीर सभेला रवाना होण्यापूर्वी ठाकरे यांचे विमानाने उस्मानाबादेत आगमन झाले. खासगी मोटारीने तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीची विधिवत पूजा केली; या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुभाष देसाई, खासदार राजकुमार धूत, आमदार नीलम गोऱ्हे, ओमराजे निंबाळकर, ओमप्रकाश खंदारे व ज्ञानराज चौगुले, माजी खासदार कल्पना नरहिरे, उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, पुरूषोत्तम बर्डे, माजी जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, गणेश सोनटक्के, शहरप्रमुख सुधीर कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्यामल वडणे आदींची उपस्थिती होती.