राज्यातील २०पटपेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या प्राथमिक शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना यांच्या वतीने बुधवारी राधानगरी येथे मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात तीन हजारांहून अधिक शिक्षक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.    
शिक्षण हक्क कायद्यानुसार पाचवीपर्यंतच्या मुलांना त्यांच्या वस्तीपासून एक किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. प्रत्यक्षात कमी पट असल्याचे कारण पुढे करून शासनवाडी-वस्तींवरच्या शाळा बंद करण्याच्या विचारात आहे. शासनाच्या या धोरणाच्या विरोधात बुधवारी राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिक्षकांच्या मोर्चाला राजकीय पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभाग नोंदविला.    
बसस्थानकापासून निघालेला मोर्चा बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे शिक्षक व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व आयफेटोचे अध्यक्ष प्रभाकर आरडे, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष नाना जोशी, जिल्हाध्यक्ष जोतिराम पाटील, राजेंद्र पाटील, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मधुकर मुसळे, उत्तम फराकटे, प्रा. टी. एस. पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी संदीप पाटील, रणजित मगदूम, सुधीर राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. बी.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, माजी सभापती संजयसिंग कलिकते आदींनी केले.