किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीला विरोध, पाटबंधारे तसेच इतर खात्यातील भ्रष्टाचार, घोटाळे, जीवनावश्यक वस्तूंचे आकाशाला भिडलेले भाव, या सर्व बाबींचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मंगळवारी (दि. ११ डिसेंबर) नागपूरमधून मोर्चा काढून विधानभवनाला घेराव घालण्यात येणार आहे.
कोल्हापुरातून किमान दोनशे कार्यकर्ते ९ डिसेंबरला महाराष्ट्र एक्स्प्रेसने नागपूरला रवाना होणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर, देवेंद्र फडणवीस मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
रास्त दरामध्ये वर्षांला १२ सििलडर मिळाले पाहिजेत, हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी ‘एसआयटी’मार्फत होऊन आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, कापूस, धान, सोयाबीन, ज्वारीला योग्य दर मिळावा. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त तालुक्यांना पिण्यास पाणी, जनावरांना चारा आणि रोजगाराची हमी सरकारने द्यावी, दुष्काळी तालुक्याबाबत सर्वपक्षीय बैठक राज्य सरकारने बोलवावी आणि एक र्सवकष धोरण ठरवावे, वीज भारनियमन रद्द करावे तसेच झालेली वीज दरवाढ रद्द करावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत.घोटाळ्यांची जोपर्यंत निष्पक्षपातीपणे चौकशी होत नाही, तोपर्यंत स्थानिक पातळीवरही उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला विजय जाधव, किशोर घाडगे, अशोक देसाई उपस्थित होते.