मानवत शहरात तातडीच्या पाणीपुरवठय़ासाठी ३ कोटी ८६ लाख खर्च करूनही पाणीटंचाई कायम आहे. या योजनेत गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करीत या सर्व कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे उद्या (शुक्रवारी) नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येणार आहे.
इरळद बंधारा ते मानवतपर्यंत टाकलेल्या जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी पालिकेने अजूनही करारनामा केला नाही. त्यामुळे जलवाहिनीचे काम बनावट झाल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केला. या बंधाऱ्यावर ५० अश्वशक्तीच्या मोटारी बसवूनही प्रत्यक्षात ५ अश्वशक्तीचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. जलपूजन होऊन १५ दिवस झाले, तरी मानवतकरांना अजूनही पाणी मिळाले नाही. या सर्व कामास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, खासदार गणेशराव दुधगावकर, सहसंपर्कप्रमुख शिवाजी दळणर, आमदार मीरा रेंगे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, महिला संघटक सखुबाई लटपटे, माजी नगराध्यक्ष सुरेश बारहाते यांच्या उपस्थितीत मोर्चा निघणार आहे.